विक्रमगड नगरपंचायतीमधील सर्वच पदे रिक्त
By admin | Published: January 7, 2017 03:19 AM2017-01-07T03:19:29+5:302017-01-07T03:19:29+5:30
नगरपंचायतीत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कारभार सुरु झाला
विक्रमगड : या नगरपंचायतीत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कारभार सुरु झाला खरा मात्र या नगरपंचायतीतील सर्व म्हणजे १५ पदे रिक्तच आहेत. त्यामुळे कारभार करायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही पदे २५ जानेवारी पर्यंत न भरल्यास उपोषण करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. जिल्हा सचिन सतीश जाणव, परेश रोडगे, कुणाल भानुशाली व अनिल फसाळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केलेले आहे़ त्याच्या प्रती मुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, आयुक्त तथा संचालक नगरप्रशासन व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
नगरपंचायतीचा कारभार सुरु करण्याअगोदरच नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे. तसेच नगरपंचायतीची मांडणी सुनियाजीतपणे करणे व नगरपंचायतीच्या नियोजनबध्द विकास करण्याकरीता तज्ज्ञ कर्मचारी वर्गाची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, सध्या फक्त मुख्याधिकारी हेच पद भरण्यात आलेले आहे़. त्यामुळे कामकाज करावे तरी कसे? हा प्रश्न मुख्याधिकाऱ्यांपुढे आहे. आकृतिबंधाप्रमाणे तज्ज्ञ कर्मचारी वर्गाची भरती २५ जानेवारी पर्यत न झाल्यास २६ जानेवारी पासून नगरपंचायत कार्यालयासमोर मनसे उपोषण करणार आहे. (वार्ताहर)
>नगरपंचायतीकरिता मंजूर पदांचा तपशील
नगरपंचायतीची लोकसंख्या १० हजारापर्यत आहे. हे ध्यानी घेता आकृतीबंधानुसार मंजूर पदांचामध्ये १) सहायक कार्यालय अधिक्षक, २) सहायक मालमत्ता पर्यवेक्षक, ३) सहायक सार्वजनिक बांधकाम अभियंता, ४) सहायक पाणीपुरवठा अभियंता, ५) सहायक नगररचनाकार, ६) सहायक समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी, ७) करनिरिक्षक, ८) लेखापाल, ९) लिपिक,
टंकलेखक, १०) गाळणी चालक, वीजतंत्री जोडारी, ११)ं पंप आॅपरेटर, वीजतंत्री जोडारी, १२) शिपाई, १३) मुकादम, १४) व्हॉल्व्हमन, १५) स्वच्छता निरिक्षक अशा एकूण १५ पदांचा समावेश आहे. त्यातील मुख्याधिकारी वगळता एकही पद भरलेले नाही़
>सद्यस्थितीत नगरपंचायत विक्रमगडकरीता प्रेमचंद्र मिश्रा यांना अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असून ते येत्या दोन दिवसांत हजर होतील, उर्वरीत १५ पदांकरीता आकृतीबंध मंजूर झाल्यावर शासनाकडून ती भरण्यात येतील कारण ही पदे राज्यशासनाच्या अखत्यारितील आहेत. मनसेकडून उपोषणासंदर्भात लेखी निवेदन दिलेले असून त्यासंदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना तसा मेल केलेला आहे. मागणीपत्र पाठविण्याची कार्यवाही केली जाणार आहे़ - डॉ़ धीरज चव्हाण, मुख्याधिकारी, विक्रमगड नगरपंचायत