सर्व खासगी रुग्णालये यापुढे सरकारनेच चालवावी; इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 08:04 PM2020-09-14T20:04:11+5:302020-09-14T20:04:23+5:30
हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या प्रती करणार जमा
पुणे : कोविड रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेल्या आणि न परवडणाऱ्या दरात, लघु आणि मध्यम आकाराची खासगी रुग्णालये चालवताना यापुढे दैनंदिन खर्च भागवणे दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे. आज (१५ सप्टेंबर) इंडियन मेडिकल असोसिएशनाच्या सदस्यांपैकी सर्व हॉस्पिटल मालक त्यांच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या प्रती आयएमए शाखा कार्यालयात जमा करणार आहेत. सरकारने सक्ती केलेल्या दरांसह रुग्णालये चालवणे त्यांना परवडणारे नाही आणि ही रुग्णालये सरकारनेच चालवावीत, असे आवाहन शासनाला केले जाणार आहे. स्वत: बनवलेल्या औषधाची चव सरकारने चाखलीच पाहिजे, अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतली आहे.
आयएमएने १२ सप्टेंबर रोजी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि दंतवैद्यकीय अशा सर्व पॅथींच्या २४ विविध वैद्यकीय संस्थांची बैठक बोलावली होती. सर्व संघटनांनी आयएमएच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून एकत्र काम करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सात दिवसांत सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर बेमुदत काम बंद करतील, यावर या बैठकीत एकमत झाले.
सरकारने ३१ ऑगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे नवे एकतर्फी दर लागू केले आणि आधीचे दर अधिक कडक केले. आयएमएने ४ सप्टेंबर रोजी राज्य पातळीवरील इमर्जन्सी स्टेट कौन्सिलच्या बैठकीत या अधिसूचनेचा निषेध केला आणि त्याविरोधात आंदोलन सुरू केले. आयएमएच्या सर्व २१६ शाखांनी ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व हुतात्मा डॉक्टरांना श्रद्धांजली वाहिली आणि डॉक्टर रुग्णांना लुटत नाहीत तर तन,मन, धन आणि वेळप्रसंगी प्राणही वेचून रुग्णसेवा करत असल्याचे जनतेसमोर आणले. १० सप्टेंबर रोजी सर्व शाखांनी आंदोलनाची कारणे सर्व जिल्हा व तालुकास्तरीय सरकारी प्रशासकांना दिली. ११ सप्टेंबर रोजी सरकारी अधिकाऱ्यांच्या जुलमी वर्तनाचा निषेध म्हणून आयएमएच्या सर्व सदस्यांनी मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीच्या प्रती महाराष्ट्रभरात जाळल्या.