पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवेत - अबु आझमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 06:44 PM2016-10-19T18:44:24+5:302016-10-19T18:44:24+5:30
देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि.19 - देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे, अशी स्पष्ट भुमिका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु आझमी यांनी धुळयात मांडली़
समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आझमी धुळयात आले होते़ या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, भाजप सरकार केवळ धार्मिक तेढ निर्माण करीत असून सर्वसामान्यांचे प्रश्न राज्यात कायम आहेत़ शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे, सुर्यनमस्काराची सक्ती केली जात आहे, मुस्लीम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप केला जात आहे, मुंबईत ५१ हजार अनधिकृत इमारती असतांना गोरगरिबांच्या झोपड्या तोडल्या जात आहेत, सर्वत्र भ्रष्टाचार वाढला असल्याचे सांगत त्यांनी विविध विषयांवर भुमिका मांडली़ ए दिल मुश्कील चित्रपटाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंवरही आझमी यांनी टिका केली़ एकिकडे राज ठाकरे चित्रपट प्रदर्शनास विरोध करीत असून भाजप सरकार चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आग्रही आहे़ त्यामुळे खरे देशद्रोही कोण? असा प्रश्न अबु आझमी यांनी उपस्थित केला़ तसेच जो न्याय सर्वसामान्यांना दिला जातो तोच राज ठाकरेंना देऊन त्यांची दादागिरी थांबवायला हवी असेही आझमी म्हणाले़ तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी अत्यंत दुबळे झाले असून बाळासाहेब ठाकरेंसारखी खंबीर भुमिका उरली नसल्याची टिका आझमी यांनी केली़ समान नागरिक कायद्याला विरोध करणार असल्याचे सांगत त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले़ यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते़
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे सांगत अबु आझमी यांनी पक्षाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली़ शिवाय सेना-भाजपसह त्यांनी काँग्रेसवरही टिका केली़