ईव्हीएम मशिन्सच्या तपासणीचे राजकीय पक्षांना वावडे; सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची दांडी

By नारायण जाधव | Published: August 14, 2024 07:10 AM2024-08-14T07:10:27+5:302024-08-14T07:11:01+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे ९ पक्षांना पुन्हा स्मरणपत्र

All representatives from political parties absent for Inspection of EVM machines urged by Election Commission | ईव्हीएम मशिन्सच्या तपासणीचे राजकीय पक्षांना वावडे; सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची दांडी

ईव्हीएम मशिन्सच्या तपासणीचे राजकीय पक्षांना वावडे; सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची दांडी

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: निवडणूक आली की नेहमीच ईव्हीएम मशीनच्या गुणवत्ता, दर्जाबाबत विविध प्रश्न करून निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या राजकीय पक्षांना ईव्हीएम प्रथमस्तरीय तपासणीप्रसंगी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी लेखी आमंत्रण देऊन बोलावूनही त्यांनी दांडी मारल्याचे उघड झाले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा येत्या रविवारी राजकीय पक्षांना पत्र पाठवून त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली आहे.

विधानसभा निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत वापरण्यायोग्य ईव्हीएम मशीन नवी मुंबईतील तुर्भे येथील सेंट्रल वेअर हाउसिंगच्या गोदाम क्रमांक ५ मध्ये ठेवली आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२४ या कालावधीत ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू आहे. या कालावधीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत उपस्थित राहावे, असे पत्र ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी २९ जुलै, २ ऑगस्ट आणि ८ ऑगस्ट २०२४ असे तीनदा पाठविले आहे. मात्र, आतापर्यंत एकाही पक्षाचा प्रतिनिधी या ईव्हीएम तपासणीस हजर झालेला नाही.

या ९ पक्षांना पाठविले स्मरणपत्र

आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल काँग्रेस, नॅशलन पीपल्स पार्टी, शिंदेसेना, उद्धवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस अशा ९ पक्षांच्या ठाणे जिल्हाध्यक्षांना हे स्मरणपत्र पाठविले आहे. यात रविवारसह सर्वच दिवशी आपला प्रतिनिधी तुर्भे गुदामाच्या ठिकाणी पाठविण्याची विनंती केली आहे.

पारदर्शी निवडणुकीसाठी आयोगाचे प्रयत्न

  • विधानसभा निवडणूक पारदर्शक व्हावी, ईव्हीएम मशीनमध्ये गडबड होऊ नये, असा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून सतत सुरू असतो. त्यासाठीच निवडणूक आली की नेहमीच ईव्हीएम मशीनच्या गुणवत्ता, दर्जाबाबत विविध प्रश्न करणाऱ्या राजकीय पक्षांच्या शंका-कुशंकाचे निरसन होण्यासाठी आयोगाचे प्रयत्न असतात.
  • राज्यातील सर्वच जिल्ह्यांत ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या साक्षीने केली जाते. मात्र, ठाणे जिल्ह्यातील एकाही पक्षाचा प्रतिनिधी १ ऑगस्टपासून आतापर्यंत हजर झालेला नाही.
  • यामुळे या दांडीबहाद्दर राजकीय पक्षांना पुन्हा एकदा १२ ऑगस्ट रोजी स्मरणपत्र पाठवून ठाण्याच्या उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी ईव्हीएमच्या प्रथमस्तरीय तपासणीस प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली आहे.

Web Title: All representatives from political parties absent for Inspection of EVM machines urged by Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.