सर्व स्कूलबसचा फिटनेस तपासण्याचे आदेश
By admin | Published: April 29, 2016 02:58 AM2016-04-29T02:58:29+5:302016-04-29T02:58:29+5:30
राज्यातील सर्व स्कूलबसचा फिटनेस तपासण्याचे आदेश देण्यात आले असून यासंबंधीचे परिपत्रक परिवहन आयुक्तांनी २७ एप्रिल रोजी जारी केले
नागपूर : राज्यातील सर्व स्कूलबसचा फिटनेस तपासण्याचे आदेश देण्यात आले असून यासंबंधीचे परिपत्रक परिवहन आयुक्तांनी २७ एप्रिल रोजी जारी केले आहे, अशी माहिती राज्य शासनाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
राज्यातील सर्व स्कूलबसचा फिटनेस तपासून त्यातील त्रुटी शाळा व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात. यापूर्वी फिटनेस प्रमाणपत्र दिले असेल, अशा बसची देखील नव्याने तपासणी करण्यात यावी. येत्या शैक्षणिक सत्रापासून एकही अनफिट स्कूलबस रस्त्यावर धावू नयेत, अशा सूचना परिपत्रकात आहेत.
वीरथ झाडे या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा ९ जानेवारी २०१२ रोजी घरासमोरच स्कूल
बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणात अॅड. फिरदोस मिर्झा न्यायालय मित्र आहेत. प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी उन्हाळ्याच्या सुटीनंतर होणार आहे.
महाराष्ट्र मोटर वाहन (शाळा बसचे नियमन) नियम-२०११ मधील नियम २(ई)मध्ये स्कूल बसची व्याख्या देण्यात आली आहे. परंतु सध्या राज्यात स्कूल बसच्या नावाखाली धावत असेली असंख्य वाहने अनफिट आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आहे. (प्रतिनिधी)
शाळास्तरावर समिती स्थापनेचे निर्देश
४ज्या शाळांमध्ये स्कूलबस आहेत, अशा सर्व शाळांमध्ये उन्हाळ्याची सुटी संपण्यापूर्वी ‘स्कूलबस समिती’ स्थापन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, समिती स्थापन झाल्यानंतर बैठकाही नियमित झाल्या पाहिजेत, असे न्यायालयाने बजावले.