नक्षलग्रस्त भामरागडमध्ये सर्वच शाळा डिजिटल
By admin | Published: March 28, 2016 02:07 AM2016-03-28T02:07:40+5:302016-03-28T02:07:40+5:30
छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या तसेच नक्षली दहशतीचा वेळोवेळी कटू अनुभव येत असलेल्या भामरागड तालुक्यातील सर्वच १०७ शाळा डिजिटल बनल्या आहेत.
गडचिरोली : छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या तसेच नक्षली दहशतीचा वेळोवेळी कटू अनुभव येत असलेल्या भामरागड तालुक्यातील सर्वच १०७ शाळा डिजिटल बनल्या आहेत. विद्यार्थी यानिमित्ताने शाळेत नियमितपणे येऊ लागल्याने पहिल्यांदाच गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी हा तालुका दत्तक घेतला. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी या तालुक्याला वेळोवेळी भेट देऊन शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यास सुरुवात केली.
तालुक्यात एकूण १०७ प्राथमिक शाळा आहेत व त्यामध्ये ४ हजार ८८६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी अद्याप मोबाइलही बघितलेला नाही. त्यातच आता मोबाइल, लॅपटॉप, संगणक, प्रोजेक्टर यांच्या मदतीने अध्यापन केले जात असल्याने हे साहित्य पाहण्याच्या उत्सुकतेपोटी विद्यार्थी स्वत:हून शाळेत येऊ लागले आहेत. डिजिटल साधनांबरोबरच सर्वच शाळांमध्ये ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन सुरू झाले आहे.