मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर शहरी भाग वगळता सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 04:39 PM2020-05-07T16:39:59+5:302020-05-07T17:05:23+5:30
लॉकडाऊनपूर्वीच राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये व विवाह नोंदणी कार्यालये बंद करण्यात आली..
पुणे : कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालये आता सुरू होत आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड शहर, नागपूर शहर, ठाणे आणि मालेगाव या कोरोनाच्या अतिप्रादुर्भाव असलेला भाग वगळून सर्व ठिकाणची कार्यालये सुरू होणार आहेत. दरम्यान कोरोना प्रभावित क्षेत्रात 17 मे नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन दुय्यम निबंधक व विवाह नोंदणी कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाला उत्पादन शुल्क विभागानंतर सर्वाधिक महसूल मिळवून देण्यामध्ये राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागांचा मोठा वाटा आहे. परंतु राज्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यानंतर लॉकडाऊनपूर्वीच राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये व विवाह नोंदणी कार्यालये बंद करण्यात आली. याचा फार मोठा फटका राज्य शासनाच्या उत्पन्नाला बसला आहे. राज्य शासनाने 3 मे नंतर लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेलता व दारू, वाईनसह सर्व दुकाने हळूहळू सुरू करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये देखील सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. राज्यत सध्या 36 जिल्ह्यापैकी बहुतेक सर्व जिल्ह्यात 90 जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालये सुरू झाली आहे. मराठवाड्यातील यवतमाळ व परभणी जिल्हात देखील दोन दिवसांत दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होतील.
तर मुंबई, ठाणे सह पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, मालेगाव हे भाग वगळता ग्रामीण भागातील दस्त नोंदणीचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच सोबतच कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात देखील उद्या पासून दस्त नोंदणीचे काम सुरू होत असल्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले.