सर्वच पक्षांना हादरा
By admin | Published: June 16, 2015 11:11 PM2015-06-16T23:11:33+5:302015-06-16T23:11:33+5:30
मंगळवारी जाहीर झालेल्या वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालामुळे सगळ्याच राजकीय पक्षांना जबरदस्त हादरा बसला आहे.
वसई : मंगळवारी जाहीर झालेल्या वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालामुळे सगळ्याच राजकीय पक्षांना जबरदस्त हादरा बसला आहे. मोदी लाटेवर आरुढ होऊन केंद्रात आणि राज्यात जशी आपण सत्ता मिळविली त्याचप्रमाणे वसईचा किल्लाही आपल्याला सहज सर करता येईल, असे स्वप्न रंगविणाऱ्या सेना, भाजपला या निवडणुकीत अवघ्या सहा जागा मिळाल्यात. त्यापैकी सेनेला ५ तर भाजपला एकच जागा मिळाली आहे. काँग्रेस, मनसे व राष्ट्रवादी या महापालिकेतून तडीपार झाले असून काँग्रेसचे अपयश अधिक दारूण आहे. कारण येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोर लावला होता. आॅस्कर फर्नांडिस, हुसेन दलवाई आणि संजय निरुपम अशा वेगवेगळ्या धर्माच्या मतदारांना अपिल असलेले नेते प्रचारात उतरवले तरी त्याचा कोणताही लाभ काँग्रेसला झाला नाही. त्यामानाने राष्ट्रवादीने निवडणुकी आधीच पराभव मान्य केल्याची मानसिकता धारण केली होती. त्यामुळे त्यांचा एकही बडा नेता या प्रचारात उतरला नव्हता. शिवसेनेने अदित्य ठाकरेंपासून ते सुभाष देसार्इंपर्यंत आणि रामदास कदमांपासून ते अनंत तरेंपर्यंत नेत्यांची फौजच प्रचारात उतरविली होती. त्यांनी मुंबईतून शिवसैनिक आणून प्रचाराची यंत्रणा शिस्तबद्धतेने राबविली. यावेळी आपल्या नगरसेवकांची संख्या किमान दोन आकडी होईल अशी तिला अपेक्षा होती. परंतु, तिला फक्त ५ जागा मिळाल्याने तिची अपेक्षा फोल ठरली आहे.
गेल्या निवडणुकीत जनआंदोलन समितीच्या माध्यमातून १८ जागा मिळविणाऱ्या विवेक पंडीत यांचा व त्यांच्या या समितीचा कोणताही मागमूस या निवडणुकीत दिसून आला नाही. मागील वेळी त्यांनी ग्रामीण भागाच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा झेंडा उभारून महापालिकेला विरोध करीत हे यश मिळविले होते. परंतु, विकास हवा असेल तर महापालिका स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. हे मतदारांना कळून आल्याने त्यांचा गतवेळचा पवित्रा आणि त्यावर आधारलेली त्यांची संघटना यावेळी साफ भुईसपाट झाली. गतवेळी मनसेचा तांत्रिकदृष्ट्या एक नगरसेवक होता. यंदा तोही अंतर्धान पावला आहे. यामुळे वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रात बहुजन विकास आघाडीचेच वर्चस्व सिद्ध झाले आहे.
खासदारकीत आघाडीच्या बळीराम जाधवांचा पराभव झाला तरी खचून न जाता तिने तीन आमदाकी, जिल्हा बँकेतील अनेक संचालकपदे, वसई विकास बँक जिंकून आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली होती. तिच्यावर या विजयामुळे आता सरताज चढला आहे. (विशेष प्रतिनिधी)
मातब्बर पराभूत
विरोधी पक्षनेते विनायक निकम, काँग्रेसचे मायकल फुर्ट्याडो
विरोधी पक्षनेता कोण ?
शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे ५ जागा मिळाल्यामुळे तिच्या कोणत्या नगरसेवकाला विरोधी पक्षनेतेपद मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.