स्वबळावर सत्तेचे सर्वांचेच नारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2017 05:28 AM2017-02-19T05:28:36+5:302017-02-19T05:28:36+5:30
प्रचार सभांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या धुवाधार फैरी शनिवारी झडल्या. मुंबईतील सभांमधून दिग्गज नेत्यांचे आवाज राज्यभर पोहोचले. तर पिंपरी चिंचवडमधून शरद पवार
मुंबई : प्रचार सभांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या धुवाधार फैरी शनिवारी झडल्या. मुंबईतील सभांमधून दिग्गज नेत्यांचे आवाज राज्यभर पोहोचले. तर पिंपरी चिंचवडमधून शरद पवार यांनीही विरोधकांवर शरसंधान केले. मुंबईत तर पालिकेचा रणसंग्रामाचा शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. खालच्या पातळीवरील बोचरी टीका, स्वबळाचे दावे-प्रतिदावे मतदार राजाने अनुभवले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रचाराची राळ उडवली. उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याच्या घोषणेनंतर ओढलेले टीकेचे आसूड अखेरच्या प्रचार सभेत अधिक तीव्र केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा कायम ठेवली. राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाजपा-सेनेवर घणाघाती प्रहार केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचार सभांचा आवाज मात्र हवा तसा घुमला नाही. भायखळ्यात अकबरुद्दिन ओवैसींनी यंदा पालिकेत ‘एमआयएम’चा पतंग उडणार असल्याचा दावा केला.
अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली मुंबई महापालिकेची निवडणूक मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर २३ तारखेला निकाल जाहीर होतील. २२७ प्रभागांमधून २,२७५ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. युती तुटल्यानंतर जवळपास सर्वच प्रभागांमध्ये पंचरंगी लढती रंगत आहेत. सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याने कुरघोडीचे राजकारण मुंबईकरांनी गेल्या २० दिवसांत अनुभवले. आता २३ फेब्रुवारीचे वेध तमाम मुंबईकरांना लागले आहेत. (प्रतिनिधी)
२३ तारखेला औकात दाखवू
शिवसेनेने गेली ५० वर्षे अहोरात्र सेवा करूनच मुंबई जिंकली आहे. मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोक कंटाळले आहेत. तरीही
ते अजून थापाच मारत आहेत. आमची औकात काढली, कपडे उतरविण्याची भाषा केलीत, मुंबईकर जनता २३ तारखेला तुम्हाला औकात दाखवेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
निवडणुकीत कोट्यवधी...
आजघडीला भाजपा निवडणुकीत कोट्यवधी रुपये ओतत आहे.
मग भारत कॅशलेस कसा? थापा मारण्यासही काही मर्यादा असतात. मागील २५ वर्षांत युती राहून या पक्षांनी काय केले? याबाबत कोणीच काहीच बोलत नाही. आम्ही नाशिकचा विकास केला.
मात्र हे लोक विकासावर बोलत नाहीत, असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपासह शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले.
२२ वर्षे पारदर्शकता
कुठे होती? - चव्हाण
खेड्यापाड्यातही मुंबईइतके खराब रस्ते नाहीत. २२ वर्षे शिवसेना-भाजपाचे ‘आपण दोघे भाऊ, मिळून सगळं खाऊ’ असे चालले होते. या २२ वर्षांत कुठे गेली होती तुमची पारदर्शकता? मुख्यमंत्री म्हणतात, परिवर्तन तर होणारच! ते होईल, पण भाजपाच्या बाजूने नाही, तर काँग्रेसच्या बाजूने, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सेना, भाजपावर हल्लाबोल केला.