‘त्या’ सर्व विद्यार्थ्यांना मिळाली इंटर्नशिप, विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 06:21 AM2023-05-28T06:21:12+5:302023-05-28T06:21:36+5:30
त्यात ७०० विद्यार्थी महाराष्ट्रातील असून ३६४ विद्यार्थी राज्याबाहेरचे आहेत.
मुंबई : परदेशात वैद्यकीय पदवी शिक्षण घेतलेल्या १,०६४ भारतीय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांच्याकडे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत, खासगी रुग्णालयांत इंटर्नशिप मिळावी म्हणून अर्ज केला होता. या सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळाली असून, त्यात ७०० विद्यार्थी महाराष्ट्रातील असून ३६४ विद्यार्थी राज्याबाहेरचे आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात एकूण ११८० जागा असून अर्ज फक्त १०६४ आले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यंना इंटर्न्सशिप देऊनही काही जागा रिक्त राहणार आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या विद्यार्थ्यांना राज्यातील ८९ रुग्णालयात इंटर्नशिप करण्याची परवानगी दिली असून, त्याची यादी जाहीर केली होती. या विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या रुग्णालयात एक वर्ष इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला दिल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा रुग्णांना देऊ शकत असल्याचा परवाना मिळतो. ते विद्यार्थी मग राज्यात मेडिकल प्रॅक्टिस करू शकतात.
काही कारणास्तव भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने असंख्य विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवतात. मात्र, अनेकांना मायदेशी परतून प्रॅक्टिस करायची असते वा पुढील शिक्षण घ्यावयाचे असते. त्यासाठी परदेशातील वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना देशात स्क्रिनिंग टेस्ट द्यावी लागते. ही परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनतर्फे घेतली जाते.
ही परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी त्यांनी ठरविलेल्या राज्याच्या वैद्यकीय परिषदेकडे इंटर्नशिपसाठी अर्ज करतात. त्यानुसार वैद्यकीय परिषदेने परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर त्यांना उपलब्ध रुग्णालयात इंटर्नशिप करण्यासाठी परवानगी दिली आहे.