आपल्यात व गिरीश महाजन यांच्यात सर्व आलबेल; खडसे यांचा यू टर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:06 AM2020-01-03T03:06:37+5:302020-01-03T07:03:19+5:30
काल आरोप, आज हास्यविनोद; खडसेंचा सूर बदलला
जळगाव : देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्यामुळे आपले विधानसभेचे तिकीट कापले गेले, असा आरोप करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दुसऱ्याच दिवशी यू टर्न घेत माझ्यात व गिरीश महाजन यांच्यात सर्व आलबेल आहे, असे सांगून आपण फडणवीस व महाजन यांच्यावर आरोप केलेच नसल्याचे सांगितले. या सोबतच आमची मने कधी दुरावलीच नाही, तर मनोमिलनाचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीच जाणीवपूर्वक माझे तिकीट कापले. त्यांना माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायची होती, असा आरोप खडसे यांनी बुधवारी केला होता. याच विषयासंदर्भात गिरीश महाजन यांनी गुरुवारी दुपारी जामनेरात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत खडसे यांच्या आरोपात तथ्य नसून त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे बोलणे संयुक्तीक नाही, असेही म्हटले होते. त्यानंतर जळगाव येथे संध्याकाळी जि.प. अध्यक्ष निवडीसंदर्भात भाजपची बैठक झाली. या निमित्ताने खडसे व महाजन एकत्र आले भाजप कार्यालयात ते दोघेही शेजारी-शेजारी बसले होते.
दोघांमध्ये हास्यविनोद
सध्या साडेसाती असल्याच्या चर्चेवरून महाजन व खडसे चांगलेच हास्यविनोदात रमले. त्यांनी एकमेकांना टाळीही दिली. फडणवीस व महाजन यांच्यासह पक्षातील इतरांबद्दलच्या नाराजीबद्दलही बोलणे टाळत खडसे यांनी सध्या केवळ जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवर लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
नाथाभाऊंची नाराजी केली दूर
एकनाथराव खडसे यांनी तिकीट कापल्याचा आरोप केला नव्हता, तर त्यांची केवळ नाराजी होती. त्यांच्याशी बोललो असून त्यांची नाराजीही दूर केली आहे, असा दावा गिरीश महाजन यांनी या वेळी केला. आमची मने कधी दुरावली नव्हती, त्यामुळे मनोमिलनाचा प्रश्नच येत नाही, असेही महाजन यांनी सांगतिले. आम्ही नेहमीच सोबत असतो असेही सांगायला दोघे विसरले नाही.