Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:16 IST2024-10-08T13:12:44+5:302024-10-08T13:16:48+5:30
Chief Minister Eknath Shinde : निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करण्यात आली आहे.

Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करण्यात आली आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या निवासस्थानी असल्याची माहिती मिळत आहे. प्रकृती ठिक नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला सोलापूर दौरा रद्द केला आहे. तसेच आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही पुढे ढकलली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजची मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची मानली जात होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूर शहरात होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी जाणार होते. हा कार्यक्रम आज साडेबारा वाजता होणार होता व त्याची संपूर्ण तयारी देखील प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.