नयना पुजारी हत्या प्रकरणी तिन्ही आरोपी दोषी

By Admin | Published: May 8, 2017 12:52 PM2017-05-08T12:52:12+5:302017-05-08T14:39:25+5:30

नयना अभिजित पुजारी(वय 26) बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये येनकर यांच्या न्यायालयाने आरोपी योगेश अशोक राऊत , महेश बाळासाहेब ठाकूर , विश्वास हिंदुराव कदम यांना दोषी ठरवलं आहे.

All three accused in the Nayana Puja murder case are guilty | नयना पुजारी हत्या प्रकरणी तिन्ही आरोपी दोषी

नयना पुजारी हत्या प्रकरणी तिन्ही आरोपी दोषी

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 8-  संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणा-या नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणात विशेष न्यायाधीश एल.एल येनकर यांच्या न्यायालयाने   तीन जणांना सोमवारी दोषी ठरविले. सात वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला.
 
योगेश अशोक राऊत (वय 24 रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 24, रा. सोळू, खेड), विश्‍वास हिंदूराव कदम (वय 26, रा. दिघी, मूळ रा. सातारा) अशी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील आरोपी राजेश पांडुरंग चौधरी हा माफीचा साक्षीदार झाला ही या खटल्याच्या सुनावणीमधील महत्वाची घटना ठरली. 
 
आरोपींविरुद्ध अपहरण, बलात्कार, खून करणे, चोरी करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते.  चौधरी याचा फौजदारी दंड संहिता कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदविलेला जबाब,   विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी 37 जणांची नोंदविलेली साक्ष, आरोपींविरुद्ध पोलिसांनी सादर केलेला भक्कम परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावा, आरोपी आणि पीडित पुजारी यांना एकत्रित पाहणाऱ्यांची साक्ष अशा मुद्यांच्याआधारे आरोपींनीच हा गुन्हा केल्याचे सिध्द झाले. 
 
ऑक्‍टोबर 2009मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. पुजारी यांचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता. त्यांच्या चेहऱ्यावर दगड मारून विद्रूप केला गेला होता. तत्पूर्वी त्यांच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून केला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर एका आठवड्याच्या आत अटक केली होती.
 
नयना पुजारी सामूहिक बलात्कार प्रकरण
सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना अभिजीत पुजारी (वय 26)आपले काम संपवून घरी जाण्यासाठी रात्री खराडी बायपास येथे झेन्सॉर कंपनीजवळ उभ्या होत्या. इंडिका कॅब चालक योगेश अशोक राऊत (वय 29, घोलेगाव,आळंदी.ता.खेड) तेथून जात असताना पुजारी यांना सोडण्याच्या बहाण्याने आपल्या मालकीच्या मोटारीतून निर्जन भागात घेऊन गेला. 3 मित्रांसह त्यांच्यावर बलात्कार केला. नंतर ओढणीने गळा आवळून खून करुन ओळख पटू नये म्हणून दगडाने चेहरा ठेचला. 
 हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 534/2009 दि.8/10/2009 रोजी दाखल झाला.भा.दं.वि.कलम 302, 376, 201, 364, 394 प्रमाणे तो दाखल आहे. योगेश अशोक राऊत (वय 27,  रमेश पांडुरंग चौधरी (वय 26, दोघेही राहणार गोळेगाव, आळंदी, ता.खेड) महेश बाळासाहेब ठाकूर (वय 26, सोळू,खेड ) विश्वास हिंदूराव कदम (वय 27, मरकळ, ता.खेड, मूळगाव खटाव, सातारा) या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 16/10/2009 रोजी अटक  केली. 
 या आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. ससून रुग्णालयाच्या त्वचा रोग विभागात दाखल असताना मुख्य आरोपी योगेश राऊत नैसर्गिक  विधीच्या बहाण्याने पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. 17/9/2011 रोजी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार झाला. त्याबाबत त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 312/2011 कलम 224, 225(अ)468,471, 120(ब)216 नुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे जनतेमध्ये संतापाची लाट पसरली. पोलिसांची नाचक्की झाली. राऊत याला पकडण्यासाठी आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.
 राऊत यास पकडण्याची जबाबदारी गृहखात्याने विशेष तपास पथकावर सोपविली. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी फरारी गुन्हेगारांना पकडण्यात वाकबगार असलेले पोलीस निरिक्षक सतीश गोवेकर यांची या पथकामध्ये नेमणूक केली. गोवेकर यांनी राऊत यास ओळखणा-या देवीदास भंडारे, संंतोष जगताप,प्रदीप सुर्वे या कर्मचा-यांचे पथक तयार केले. या पथकाने राऊत याच्या गावातील मित्र, नातलग, विरोधक,बालपणीचे मित्र, आजवर केलेल्या नोक-यांमधील सहकारी यांच्याशी संपर्क वाढवून राऊत याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. 
 तपास पथकाची नजर राऊत याचा लहान भाऊ मनोज, आई सुनिता आणि पत्नी श्रावणी योगेश राऊत यांच्यावर होती. राऊत कुटुंबियांचे बेफिकीर वागणे पथकातील जाणकारांना खटकत होते. राऊत याची आस्तिक स्वभावाची आई, पत्नी,सासू, मेव्हणा देवदेवस्की करत असताना त्यांच्या संपर्कात येणा-या पोतराज अशोक शेडगे (यवत, दौंड)याला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य सांगून त्याच्या आईकडून काही माहिती मिळविली.  तसेच येरवडा कारागृहात राऊत ज्यांच्या संपर्कात होता, त्या गुन्हेगारांकडूनही काही माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 गुजरातमधील वापी,बडोदा,पोरबंदर,सोमनाथ, व्दारका,अहमदाबाद, राजस्तानमधील अजमेर,चितोडगड,जयपूर अशा ठिकाणी विशेष तपास पथकाने राऊत याचा अथक शोध घेतला. तो सुरतमधील बादलसिंग (मूळ बिहार)यास पळून गेल्यानंतर दुस-याच दिवशी भेटल्याची माहिती पोलिसांना समजली. 
 या दरम्यान दिल्लीतही गँगरेपमुळे देशभर असंतोष पसरला. हेच कारण पुढे करुन नयना पुजारी हिचे पती अभिजीत पुजारी यांनी काही संघटनांसोबत पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला. प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण झोतात ठेऊन विशेष तपास पथकाबाबत नाराजी व्यक्त केली. अशा वेळी सतीश गोवेकर यांना राऊत पंजाब, दिल्ली येथे असल्याची माहिती समजली. या माहितीचा पाठपुरावा करण्यासाठी तपास पथक मे महिन्यात दिल्लीमध्ये दाखल झाले.15 दिवसांमध्ये 20 ते 25 जणांकडे चौकशी करुनही राऊत याच्या वास्तव्याचा पत्ता मिळत नव्हता. चिकाटीने तपास पथक काम करत असताना राऊत हा दिल्लीहून शिर्डीला रवाना झाल्याची माहिती समजली. पथकाने तत्काळ बायरोड शिर्डी गाठली. ज्या ठिकाणी राऊत येणार होता, तेथे सापळा रचला. शिर्डी बस ठाण्यात राऊत आलेला दिसल्यावर पथकातील संतोष जगताप यांनी त्यास ओळखले. राऊत याला पकडून बेड्या ठोकण्यात आल्या. या खटल्यात शासनाने अ‍ॅड हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली.

Web Title: All three accused in the Nayana Puja murder case are guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.