रूद्रच्या कारनाम्यांबाबत सारेच अनभिज्ञ---आॅन दि स्पॉट रिपोर्ट

By admin | Published: September 22, 2015 10:52 PM2015-09-22T22:52:30+5:302015-09-22T23:58:03+5:30

कुटुंबीय चिंतेत : काराजनगीतही माहिती नाही; गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित-

All the unaware of Rudra's actions --- Aan the Spot Report | रूद्रच्या कारनाम्यांबाबत सारेच अनभिज्ञ---आॅन दि स्पॉट रिपोर्ट

रूद्रच्या कारनाम्यांबाबत सारेच अनभिज्ञ---आॅन दि स्पॉट रिपोर्ट

Next

जयवंत आदाटे- जत ---ना आई-वडिलांना माहिती, ना गावाला कल्पना! तो कोठे आहे, काय करतो, याबद्दल सारेच अनभिज्ञ. कारण सहा-सात वर्षांपासून तो गावातच आलेला नाही. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित रुद्रगोंडा पाटीलची ही कहाणी.      त्याचे नाव रुद्रगोंडा रेवगोंडा पाटील. वय ३२. गाव जत तालुक्यातील काराजनगी. निगडी ते काराजनगीदरम्यान डोंगराळ भागात पाटील वस्ती आहे. तिथेच रुद्रचे घर आहे. साधे कौलारू घर. सारे कुटुंब पूर्णपणे अशिक्षित आणि शेतकरी. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात रुद्रचे वडील रेवगोंडा आप्पासाहेब पाटील (वय ६७), आई रत्नाक्का (६०) यांना काहीही माहीत नाही. रुद्रगोंडाला चार चुलते, पण सगळे स्वतंत्र राहतात. वडिलांसह पाचजणांच्या नावावर १०२ एकर शेतजमीन आहे. परंतु दुष्काळी परिस्थिती व डोंगराळ जमीन असल्यामुळे त्यातून मिळणारे उत्पादन नाममात्रच. आई-वडील पशुपालन व शेती व्यवसाय करून गुजराण करतात. रुद्रगोंडा हा रेवगोंडा यांचा एकुलता एक मुलगा. त्याला जयश्री, सुवर्णा, राजाक्का या बहिणी आहेत. त्यांचे लग्न झाले असून, त्या सासरी असतात. रुद्रचे चुलते चनगोंडा पाटील काराजनगीचे पोलीसपाटील आहेत. आई-वडिलांव्यतिरिक्त रुद्रच्या घरी कोणीही नाही. रुद्रगोंडा, मडगाव बॉम्बस्फोटातील मृत चुलत भाऊ मलगोंडा सिदगोंडा पाटील व चुलते इरगोंडा पाटील हे ‘सनातन’चे साधक. चुलते इरगोंडा यांच्यामुळेच रुद्रगोंडा आणि मलगोंडा ‘सनातन’कडे ओढले गेले. कुटुंबातील या तिघांव्यतिरिक्त इतर कोणीही सनातनचे साधक म्हणून काम करत नाहीत. सेवानिवृत्त शिक्षक असलेले इरगोंडा पाटील ‘सनातन प्रभात’चे जत तालुका बातमीदार म्हणून काम करत आहेत; परंतु पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला पोलिसांनी अटक केल्यानंतर तेही जत शहरातून गायब झाले आहेत.रुद्रगोंडाचे पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण काराजनगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, आठवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण निगडी बुद्रुक हायस्कूल येथे व अकरावी आणि बारावीचे शिक्षण शिराळा येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो सांगलीला गेला. त्यादरम्यान त्याने सांगलीत मोबाईल दुरुस्तीचे दुकान सुरू केले होते. सुरुवातीपासून तो सनातनचा साधक म्हणून काम करत होता. सांगलीत गेल्यानंतर तो ‘सनातन’चा कट्टर साधक बनला. २००८च्या दरम्यान त्याने प्रीती या मुलीशी विवाह केला. विवाहानंतर एक-दीड वर्षापर्यंत ते दोघे काराजनगी येथे येत-जात होते. सध्या प्रीती सांगली शहरात वकिली करत असल्याचे त्याचे आई-वडील सांगतात. २००९ मधील मडगाव (गोवा) येथील बॉम्बस्फोटात मलगोंडा पाटील याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी रुद्रगोंडा काराजनगी येथेच होता. स्थानिक आणि गोवा पोलिसांनी त्यावेळी त्याची चौकशी केली होती. त्यानंतर आठ-दहा महिन्यांनी तो काराजनगी येथून बेपत्ता झाला होता. तेव्हापासून तो बेपत्ताच आहे.
रुद्रगोंडाच्या आईला मराठी बोलता येत नाही व बोललेले समजतही नाही! त्यांच्यावर कन्नड भाषेचा प्रभाव आहे. रुद्रगोंडाचे रेवगोंडा यांच्या शिधापत्रिकेत नाव नाही. पाटील कुटुंबियांनी मागील चार-पाच वर्षे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सापडला
नाही. तो गावात राहत नाही आणि येथे पाच वर्षांत आला नाही आणि येत नाही, असा लेखी दाखला त्याचे चुलते व गावचे पोलीसपाटील चनगोंडा पाटील यांनी जत पोलिसांना दिला आहे.
पाटील कुटुंबीय काराजनगीत राहत असले तरी, पोलीसपाटील वगळता घरातील इतरांना गावात कोणीही फारसे ओळखत नाहीत. वर्तमानपत्रातून बातम्या आल्यानंतर ग्रामस्थांना त्यांची माहिती मिळाली. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली. निगडी आणि काराजनगी या दोन्ही गावांशी रुद्रगोंडाचा संपर्क आला नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल ग्रामस्थांकडून कोणतीही माहितीच मिळत नाही!

आम्हाला काहीच माहिती नाही...
रुद्रगोंडाचे आई-वडील व चुलते तर म्हणतात, ‘२००९ पासून रुद्रगोंडा बेपत्ता आहे. तो जिवंत आहे की मृत आहे, तेच समजून येत नाही. मग तो हत्या कशी करू शकतो? प्रसारमाध्यमांतून उलट-सुलट बातम्या येत आहेत. कोणी खून केला आहे आणि कोणाचा खून झाला आहे, याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही... हात जोडतो, आम्हाला काही विचारू नका!’

Web Title: All the unaware of Rudra's actions --- Aan the Spot Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.