सारा लग्नाचा खर्च माझा....तुम्ही फक्त पोरगी द्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 07:38 PM2018-12-12T19:38:34+5:302018-12-12T19:39:07+5:30
हुंडा मिळाला नाही तर किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलीची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे...
शिरुर (कान्हूरमेसाई) : पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे. हुंडा मिळाला नाही तर किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलीची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सध्या चक्र पालटले असून, आम्हाला हुंडा नको फक्त तुमची मुलगीच हवी, अशी आर्जव करण्याची वेळ उपवर पित्यावर आलेली दिसून येत आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकरीविरोधी धोरण यामुळे शेतीला वाईट दिवस आले आहेत, त्यामुळे प्रत्येक पित्याला आपली मुलगी सुखी-समाधानाने नांदावी अशीच आस आई-वडिलांना असते. त्यापोटीच चांगला वर शोधण्यासाठी पिता समाजात, लग्नकार्यात फिरताना तसेच नातेवाइकांमध्ये विचारपूस करताना दिसतो. सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातील वधूपित्याची नजर कमावत्या मुलाकडे वळली आहे. त्या दृष्टीने वधूपिता मुलांकरिता शोधमोहीम राबवित असल्याचे दिसून येत आहे. पण शेतकरी पित्याची मुलगी असो वा नोकरदार पित्याची, सर्वच जण शेतकरी मुलांकडे दुर्लक्ष करीत आहेत. निसर्गाच्या दुष्टचक्र,तोट्याचा ठरणारा शेती व्यवसाय आणि मुलीच्या पित्याचे असलेले नोकरदार मुलांचे स्वप्न त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाहेच्छुक मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी आत्महत्यामागे नैैसर्गिक आणि शासनाच्या अनस्थेने निर्माण झालेल्या कारणाप्रमाणेच शेतकºयांनी स्वत:भोवती गुंडाळून घेतलेल्या सामाजिक प्रतिष्ठेची प्रथाही कारणीभूत असल्याचे बोलले जाते. पूर्वी मुला-मुलींच्या लग्नाचे बार धूमधडाक्यात उरकण्याकरिता वाट्टेल ते करणाऱ्या बहुतांश शेतकरी कुटुंबीयांना आता बदलत्या परिस्थितीत मुलांचे लग्न जुळवण्याकरिता आटापिटा करावा लागत आहे. त्यामुळे मुलांकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करायला तयार होत आहे, तर काहींनी मुलींना हुंडाही दिल्याचे वास्तव असल्याने या परिस्थितीवरून मुलापेक्षा मुलगी बरी ,असे म्हणण्याची वेळ वर पित्यावर आली आहे.
मुलीच्या शोधात वाढतेय वय....
शिरूर तालुक्यातील हजार पंधराशे लोकसंख्या असलेल्या अनेक गावांमध्ये लग्नाचे वय होऊनही लग्न जमत नसलेल्या शेतकरी मुलांचे वय आता ३0 ते ३५ वर गेलेले दिसून येत आहे. परिसरात अनेक गावांमधील तरुण मंडळी मागील तीन वर्षांपासून लग्नाच्या प्रतीक्षेत आहे. तरीही मुलगी मिळत नसल्याने काही नवरदेवांनी मुलगी पाहण्यासाठी बीड, उस्मानाबाद, लातूर, बार्शी, नांदेड, पूर्णा, या गावांकडे आपली शोधमोहीम सुरू आहे. काही मुलांनी तुम्हाला पाहिजे असेल तर पैसा देतो, लग्नाचा संपूर्ण खर्च आम्हीच करतो फक्त मुलगी द्या, असाही निर्णय घेतल्याचे सांगितले जाते, तरीही मुलगी मिळत नसल्याचे वास्तव आहे. ही परिस्थिती तालुक्याचीच नाही तर इतर भागात हीच अवस्था आहे. ,
शेतकरी नवरा नको, पण शेती हवी....
शेतकरी असलेल्या मुलांना मुली देण्यासाठी सध्या कोणताही वधूपिता तयार होत नाही, आधी नोकरीला प्राधान्य दिले जाते, मुलगा नोकरीवर असल्यास त्याला मुलगी देण्याकरिता होकार दर्शवितात, परंतु काही ठिकाणी सध्या नोकरीसोबतच शेती आहे का? असाही प्रश्न पुढे येतो. काहींना नोकरीसोबतच मुलाकडे शेतीही पाहिजे आहे, यावर शेतकरी नवरा नको, पण शेती हवीय, पण कशासाठी? असा प्रश्न वरपित्यामध्ये उपस्थित होत आहे .
-----------