पाकिस्तानकडून भारतातील सर्व स्त्रियांचा अवमान- अॅड. उज्ज्वल निकम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 01:50 PM2017-12-31T13:50:55+5:302017-12-31T13:52:25+5:30
मिरज : कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीच्या भेटीबाबत भारत सरकारचे चांगले पाऊल होते; मात्र पाकिस्तानने नेहमीचा कपटी पवित्रा घेतला. या भेटीतून दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू होईल, अशी आशा होती.
मिरज : कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीच्या भेटीबाबत भारत सरकारचे चांगले पाऊल होते; मात्र पाकिस्तानने नेहमीचा कपटी पवित्रा घेतला. या भेटीतून दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू होईल, अशी आशा होती; मात्र पाकिस्तानने जाधव यांच्या आई व पत्नीचा अवमान करून संपूर्ण भारतातील स्त्रियांचा अवमान केला, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाट्य दिग्दर्शक डॉ. दयानंद नाईक यांनी घेतलेल्या मुलाखतीत अॅड. उज्ज्वल निकम यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. निकम म्हणाले की, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीचा अवमान करून संपूर्ण भारतातील स्त्रियांचा अवमान केला आहे. बुटात चिप आहे काय हे समजत नसलेल्या पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा भिकारी आहे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
व्यक्ती पाहिल्यानंतर तिची वृत्ती, प्रवृत्तीचा मी अंदाज बांधतो. आरोपीवर मानसिक प्रभाव टाकावा लागतो. अबू सालेम यास, मोनिका तुझ्यावर खरोखर प्रेम करीत होती का, बिगबॉसमध्ये दुस-यासोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू आहे, असे मी म्हटल्यावर तो दुस-या दिवसापासून पाहा असे म्हणाला. दुस-या दिवसापासून बिग बॉसमध्ये मोनिका ही सहका-यासोबत चार हात लांब असल्याचे दिसले. यामुळे गुन्हेगारांचे हात किती लांब असतात, हे समजले. मुख्यमंत्री, राज्यपाल व हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या व्यक्तींसह मला देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा माझ्यासाठी भूषणावह नाही.
आपण शास्त्र शाखेचे विद्यार्थी, वडील राजकारणी असताना राजकारणात न जाता वकील कसे झाला, या प्रश्नावर निकम म्हणाले की, वकील होण्याची माझी इच्छा नव्हती. लग्नाच्या बाजारात वकिलाची किंमत डाऊन आहे. काळ्याचे पांढरे, खºयाचे खोटे असा आभास निर्माण करणारा वकील असा त्याचा लौकिक आहे. आपल्या देशात या व्यवसायाकडे चांगल्या दृष्टीने पाहात नाहीत. परदेशात मात्र या व्यवसायाला प्रतिष्ठा आहे. देव, धर्म, योगावर विश्वास आहे का? या प्रश्नावर मी नास्तिक व आस्तिक दोन्हीही नाही, असे त्यांनी सांगितले.
वकिली करीत असताना मला संतापाने कविता सूचत गेल्या. डोळे फाडून बघते ती बायको, जिच्यापुढे डाळ शिजत नाही, ती असते बायको, मला आठवे तारुण्याचे दिवस आगळे या कविता त्यांनी उपस्थितांना ऐकविल्या. एखाद्या खटल्याचा युक्तिवाद करताना संस्कृत या भाषेमुळे न्यायाधीशांवर प्रभाव पडतो. हा भाषेचा फायदा असल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले.
रस्ते का खराब?
सांगली, मिरजेतील खराब रस्त्यांचा अॅड. निकम यांनी मुलाखतीत उल्लेख केला. सांगलीने राज्याला नेतृत्व व अनेक मुख्यमंत्री दिले; मात्र तरीही येथील रस्ते खराब का आहेत, हे माहीत नसल्याचे अॅड. निकम यांनी मिश्किलपणे सांगितले.