अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप, 'राजगड'वर नेमकं काय घडलं?; मनसेनं केला खुलासा
By प्रविण मरगळे | Published: January 9, 2024 03:53 PM2024-01-09T15:53:32+5:302024-01-09T15:54:27+5:30
जाधव यांच्याबद्दल अनेक खंडणीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. कामोठे पोलीस ठाण्यात महेश जाधवबद्दल अनेक तक्रारी आहेत असं मनसेनं सांगितले.
मुंबई - मनसे पदाधिकारी आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले. जाधव यांच्या या आरोपानंतर मनसेने यावर सविस्तर खुलासा केला आहे. महेश जाधव यांच्याबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे सातत्याने येत होत्या. कामगारांची फसवणूक करून जाधव त्यांच्यावर अरेरावी करायचे त्यामुळे त्या वादातून कामगारांनीच जाधव यांना मारहाण केल्याचं मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी सांगितले आहे.
या घटनेवर मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून महेश जाधव यांच्याविरोधात कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे येत होत्या. त्याबाबत चार पाच वेळा पक्षाने त्यांना बोलावलेही होते. जाहीर सक्त ताकीद दिली होती. कामगारांच्या हितासाठी तुमचे धोरण बदला. कामगारांचे नुकसान करू नका असं सांगितले होते. आज ते कामगार न्याय मागायला राजगडवर आले होते. तेव्हा यापुढे ही युनिट तुम्ही पाहायची नाही. पक्षाकडून दुसरा व्यक्ती युनिटवर नेमली जाईल असं पक्षाने सांगितले. तरीही तो कामगारांसोबत वाद घालू लागला. त्यात ज्या कामगारांना महेश जाधव यांनी फसवलं त्यांनीच जाधव यांना मारहाण केली असं त्यांनी स्पष्ट सांगितले.
त्याचसोबत महेश जाधव यांचे आजचे नाही. जाधव यांच्याबद्दल अनेक खंडणीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. कामोठे पोलीस ठाण्यात महेश जाधवबद्दल अनेक तक्रारी आहेत. एका मुलीचं अपहरण करून तिला ३ दिवस डांबून ठेवले होते हेदेखील कामोठे पोलीस ठाण्यात नोंद आहे. सातत्याने महेश जाधव यांच्याविरोधात अशा तक्रारी येत होत्या त्यामुळे पक्षाने जाधव यांच्यावर कारवाई करण्याचं ठरवलं होते. मात्र त्याआधीच कामगारांच्या वादातून महेश जाधव यांनी मार खाल्ला.कामोठे परिसरातील विविध बिल्डरकडे चौकशी केली तर तेथील बिल्डरही खंडणीखोर कोण आहेत हे सांगतील. महेश जाधव यांच्या आरोपांनी आमची अब्रु जात नाही. लोकशाही आहे त्यांना जे काही बोलायचे असेल ते बोलतील असा पलटवारही मनसेच्या योगेश चिल्ले यांनी महेश जाधव यांच्यावर केला.
काय आहे प्रकरण?
महेश जाधव हे मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नुकतेच फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले. अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी मला बेदम मारलं. कसाबसा जीव वाचवून माथाडी कामगारांनी मला तिकडून पळवून आणले. या लोकांनी मला वाचवलं. राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारलं आहे. हे नेमकं काय आहे? मागील २० वर्ष मी राज ठाकरेंसोबत घालवली. ते दाखवतात एक आणि करतात एक. राज ठाकरेंचा पक्ष फक्त खंडणीखोर आहे असं त्यांनी म्हटलं.