दाभोलकर कुटुंबीयांवरील आरोप धादांत खोटे; ‘अंनिस’चे स्पष्टीकरण, गेल्या वर्षीच अविनाश पाटील यांना विश्वस्तपदावरून काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:18 AM2022-01-31T10:18:32+5:302022-01-31T10:19:55+5:30
Maharashtra News: अविनाश पाटील यांना अक्षमता आणि ट्रस्टविरोधी कारवायांमुळे विश्वस्तपदावरून गेल्या वर्षीच काढले आहे. तसेच हमीद आणि मुक्ता हे ट्रस्टी नाहीत. त्यामुळे पाटील यांचे आरोप धादांत खोटे आहेत,’ असा प्रतिहल्ला Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti ट्रस्ट सचिव दीपक गिरमे यांनी केला आहे.
सातारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व व्यवहार ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे केले जातात. अविनाश पाटील यांना अक्षमता आणि ट्रस्टविरोधी कारवायांमुळे विश्वस्तपदावरून गेल्या वर्षीच काढले आहे. तसेच हमीद आणि मुक्ता हे ट्रस्टी नाहीत. त्यामुळे पाटील यांचे आरोप धादांत खोटे आहेत,’ असा प्रतिहल्ला अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्ट सचिव दीपक गिरमे यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीपत्रकात गिरमे यांनी म्हटले आहे की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ही नोंदणीकृत न्यासाच्या स्वरुपातील कायदेशीर व आर्थिक रचना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी स्थापन केली. ‘अंनिस’चे कार्य या ट्रस्टमार्फत चालते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हयातीत व नंतरही समितीचे सर्व आर्थिक व्यवहार हे ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामार्फत केले जातात. ट्रस्टच्या स्थापनेपासून आतापर्यंत प्रतापराव पवार अध्यक्ष आहेत. ट्रस्टमधील सर्व निर्णय चर्चेनंतर सहमतीने घेतले जातात. तसेच अविनाश पाटील यांना विवेक जागर नावाचा स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केल्यानंतर अंनिसचे नाव वापरू नये, यासाठी समज दिलेली आहे. त्यांचा आमच्याशी कोणताही कायदेशीर, आर्थिक संबंध नाही.
वैयक्तिक आकसापोटी पाटील यांनी हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटाने ट्रस्ट ताब्यात घेतला, असा आरोप केला आहे. तसेच हमीद, मुक्ता दाभोलकर ट्रस्टी नाहीत. त्यांनी तसेच एकाही ट्रस्टीने आजअखेर एकदाही नवा पैसाही मानधन किंवा प्रवास खर्च घेतलेला नाही. ट्रस्टचे कार्यालय दाभोलकर कुटुंबीयांनी मोफत वापरण्यास दिलेल्या जागेत चालते. ट्रस्टमार्फत चालविल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सांगली येथे कार्यालय आहे. ही जागा सोडता ट्रस्टची कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. त्यामुळे ट्रस्टच्या मालमत्तेवर कुणी ताबा घेतला, हे अत्यंत खोडसाळ आणि असत्य आरोप आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.
समितीचा कोणीही कार्याध्यक्ष नाही...
प्रा. डॉ. एन. डी पाटील यांच्या निधनानंतर पद रिक्त झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून व ‘अंनिस’ ट्रस्टच्या संमतीने संघटनेच्या हितचिंतक सरोज पाटील यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी सर्व पार्श्वभूमी समजावून घेत अध्यक्षपद स्वीकारले आहे. ही पूर्णपणे कायदेशीर बाब आहे. याच्याशी विवेक जागर ट्रस्टचे अविनाश पाटील यांचा संबंध नाही. राज्य पातळीवर कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, राज्य सरचिटणीस ही सर्व पदे रद्द केली आहेत. त्यामुळे समितीचा कोणीही कार्याध्यक्ष नाही, असेही दीपक गिरमे यांनी स्पष्ट केले आहे.
हमीद-मुक्ता गटाने ट्रस्ट ताब्यात घेतली : पाटील
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा डॉ. हमीद आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी संघटनेचा सात कोटींचा निधी असलेली ट्रस्ट ताब्यात घेतला आहे. तसेच आम्ही अजूनही डॉ. एन. डी. पाटील यांच्या दु:खात आहोत. त्यामुळे ‘अंनिस’च्या नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्नच येत नाही,’ असा आरोप कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे.