राज्यमंत्र्यांवरील आरोपाने गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:45 AM2017-08-01T01:45:15+5:302017-08-01T01:45:15+5:30
राज्य सरकारमधील एका राज्यमंत्र्यांवर एका महिलेने केलेल्या आरोपावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ माजला.
मुंबई : राज्य सरकारमधील एका राज्यमंत्र्यांवर एका महिलेने केलेल्या आरोपावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ माजला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्या महिलेचे निवेदनच वाचून दाखविल्याने, ‘ते’ राज्यमंत्री कोण? याची चर्चा रंगली.
सांगली येथील एका महिलेने पत्रकार परिषद घेऊन एका राज्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारने त्यावर काय कारवाई केली, अशी विचारणा अजित पवार यांनी केली. पवारांनी संबंधित महिलेचे निवदेन वाचून दाखविताच, सभागृहात एकच गदारोळ झाला. नाव घेऊन आरोप करा, अशी मागणी सत्ताधारी बाकांवरून झाली. मात्र, आपण आधी नोटीस दिलेली नसल्याने व प्रकरण अचानक समोर आल्यामुळे आपण त्या राज्यमंत्र्यांचे नाव घेत नाही, असे पवार यांनी सांगितले.
या आरोपानंतर सभागृहात दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. अनेक सदस्य बोलायला उभे राहिले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंत्रिमहोदयांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, असे तीन-तीन वेळा सांगितले, पण सभागृहात अनेक मंत्री हजर असताना कोणीही उठून त्यांना प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे नाव घेऊन पुन्हा निर्देश दिले. त्यांचेही या वेळी सभागृहात लक्ष नव्हते. त्यांचेही दोन-तीन वेळा नाव पुकारल्यावर गृहराज्यमंत्री उभे राहिले व ‘चौकशी करतो’ असे बोलून खाली बसले.
विरोधकांनी नाव घेऊन बोलावे, नुसते एक राज्यमंत्री म्हणाल्याने सर्वच मंत्र्यांबद्दल संशयाचे वातावरण तयार होते, असा आक्षेप घेत, एकनाथ खडसे यांनी सराकरची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. शिवाय ज्या महिलेविषयी आपण बोलत आहात, त्या महिलेने तक्रार मागे घेतल्याची आपली माहिती असल्याचे खडसे म्हणाले. त्यानंतर, पुन्हा सभागृहात गदारोळ माजला. शेवटी विरोधकांनी सभात्याग केला.