शेतक-यांप्रति सरकार असंवेदनशील , अशोक चव्हाण यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:10 AM2018-01-25T03:10:00+5:302018-01-25T03:10:19+5:30
शेतमालाला हमीभाव, भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आत्महत्या करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घ्यावी लागली. मात्र, तरीदेखील या असंवेदनशील सरकारला जाग आलेली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
जळगाव : शेतमालाला हमीभाव, भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आत्महत्या करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घ्यावी लागली. मात्र, तरीदेखील या असंवेदनशील सरकारला जाग आलेली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बुधवारी जळगावात काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘व्हीजन २०१९’ शिबिरात खा. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, भाई जगताप, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस आदी नेते मंडळी उपस्थित होती.
जनतेचे प्रश्न सोडविण्यात केंद्र आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले असल्यामुळे भावनिक व जातीय मुद्दे उपस्थित करून लोकांची मने विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्रातील मंत्रीच राज्यघटना बदलण्याची भाषा करू लागले आहेत. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. भाववाढ अटळ असून, या इंधन दरवाढीविरुद्ध १६ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.
साहेब, स्वबळावर लढा!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेसने इतर पक्षाशी आघाडी केल्यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही. लोकांना ‘पंजा’चा विसर पडू नये, यासाठी तरी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्या, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे धरला.
बुलेट ट्रेन नको- पृथ्वीराज
बुलेट ट्रेनचा निर्णय अव्यवहार्य असून, त्यावर होणारा भरमसाठ खर्च रेल्वेच्या इतर विकासासाठी खर्च केल्यास मोठा फायदा होऊ शकतो़ निविदा न काढता जपानला कंत्राट दिल्याने याची चौकशी व्हावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.