ठाकरेंच्या उपस्थित पक्षप्रवेश, भुसेंसोबत कनेक्शन; ड्रग्समाफियावरून राजकारण रंगलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 01:42 PM2023-10-11T13:42:37+5:302023-10-11T13:42:49+5:30
कुणाच्या सांगण्यावरून आरोपीला रुग्णालयात दाखल केले? याची उत्तरे समोर आली पाहिजेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
मुंबई – पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्समाफिया ललित पाटील याच्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच राजकारण रंगलं आहे. ललित पाटील आणि दादा भुसे कनेक्शनवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले. त्यानंतर ललित पाटील याचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश झाल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर दादा भुसे यांनीच ललित पाटीलला शिवसेनेत आणले असा आरोप केला जात आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, नाना पटोलेंनी नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन नाशिकमधील शिंदे गटातील आमदारांचा हात आहे म्हटलं, काल पुण्यातील काँग्रेस आमदाराने मंत्र्याचा हात असल्चाचे सांगितले. मी राजकीयपेक्षा सामाजिक हिताला जास्त महत्व देते. तरुणाईची मला चिंता आहे. नाशिक-शिंदे गट आणि मंत्री असं कनेक्शन येत असेल तर तिथे दादा भुसे आहेत. त्यांनी माघार घेऊ नये, चौकशी करावी असं मी म्हटलं. दादा भुसे चौकशीला तयार असून गृहमंत्री काय बोलत नाही. इतक्या गंभीर प्रकरणावर न बोलता टोलवर विषय भरकवटता. मी राजकीय आरोप केले नाही. दादा भुसेंना मी व्यक्तिश: भेटली नाही. मला राजकीय फायदा घ्यायचा नाही. काही संबंध नाही. नाशिक आणि शिंदे गट असं कनेक्शन पुढे येत असेल तर नाशिकचे शिंदे गटाचे दादा भुसे आहेत. एखाद्या रुग्णाला सलग ९ महिने उपचारासाठी दाखल केले जात नाही. कुणाच्या सांगण्यावरून आरोपीला रुग्णालयात दाखल केले? याची उत्तरे समोर आली पाहिजेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच जो फोटो व्हायरल झाला, त्यात उद्धव ठाकरे होते, एखादी व्यक्ती ज्या जिल्ह्यातून पक्षात येते, त्या जिल्ह्यातील मोठे नेते त्यांना घेऊन येतात. ललित पाटील याला दादा भुसेंनीच मातोश्रीवर आणले होते. असाच फोटो जयसिघांनी प्रकरणावेळीही समोर आले होते. तेव्हा एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून ते आले होते. माझा विवेक जागा ठेवत शब्दछळ न करता ससूनमधील माजी डीन, आत्ताचे डीन आणि स्टाफ यांची चौकशी झाली पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी मागणी केली.
नाशिक शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखाने आरोप फेटाळला
पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर जे सुषमा अंधारे यांनी आरोप केले, त्यात आम्ही काही फोटो माध्यमांना दिले त्यात ललित पाटील आणि भूषण पाटील यांचा उबाठा गटातील नेत्यांसोबत संबंध असल्याचे दिसते. या नेत्यांची चौकशी होणे गरजेचा आहे. सुषमा अंधारेंनी हे फोटो पाहावेत आणि पालकमंत्री भुसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नये. उबाठा गटाचे जे नेते आहेत त्यांचे ललित पाटील यांच्याशी संबंध काय आहेत यावर सुषमा अंधारेंनी मागणी करावी. या प्रकरणाची चौकशी व्हावी असं नाशिकचे शहरप्रमुख प्रविण तिदमे यांनी प्रत्युत्तर दिले.