महाविद्यालयांत काेट्यवधींची अनामत रक्कम पडून, कॉप्स संघटनेचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 03:49 AM2021-02-19T03:49:58+5:302021-02-19T03:50:15+5:30
colleges : अनामत रकमेचा उपयोग व्हावा यासाठी ती ईबीसी विद्यार्थ्यांच्या विविध गरजांसाठी वापरावी, अशी मागणी त्यांनी राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण संचालकांना केली.
मुंबई : राज्यातील विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना ठरावीक रक्कम अनामत म्हणून घेतात. अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ती महाविद्यालय प्रशासनाकडे जमा असते. त्यानंतर नियमावलीनुसार ती विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक महाविद्यालये ती परत देत नसल्याने राज्यातील ३,१४१ महाविद्यालयांत अशी ५०० कोटींहून अधिक अनामत रक्कम पडून असल्याचा दावा कॉप्स (केअर ऑफ पब्लिक सेफ्टी) संघटनेचे कार्यालयीन अधीक्षक अमर एकाड यांनी केला.
या अनामत रकमेचा उपयोग व्हावा यासाठी ती ईबीसी विद्यार्थ्यांच्या विविध गरजांसाठी वापरावी, अशी मागणी त्यांनी राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण संचालकांना केली. ईबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात अनेकदा आर्थिक मदत अपुरी पडते. त्यामुळे ईबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह व मेस शुल्क, शैक्षणिक साहित्य - वह्या, पुस्तके, दफ्तर इ., वैद्यकीय सुविधा, कमवा व शिका योजनेसाठी निधी उपलब्ध करणे, अशा ४ घटकांवर ही रक्कम खर्च करण्याचे परिपत्रक काढून तत्काळ अंमलबजावणीची मागणी एकाड यांनी संचालक व सर्व विभागीय सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण यांच्याकडे केली.
काही महत्त्वाच्या महाविद्यालयांकडे असलेली अनामत रक्कम
१) जय हिंद महाविद्यालय, मुंबई ५२,५०,५१०/-
२) लाला लजपतराय महाविद्यालय, मुंबई ६६,९५,८१०/-
३) चेतना महाविद्यालय, मुंबई ३८,९९,३८२/-
४) एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई ३३,३३०००/-
५) के.सी. महाविद्यालय, मुंबई ४२,३५,११५/-
६) मॉडर्न महाविद्यालय, पुणे १४,२८,४३०/-
७) फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे ११,७३,१००/-
८) आनंद निकेतन महाविद्यालय, चंद्रपूर ५,२७,२४२/-
९) लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालय, सिंधुदुर्ग ४,२८,२८४/-
१०) कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय रायगड १५,७७,८९६/ -