भाजपाच्या प्रो-ओबीसी राजकारणाला तडा की पुस्तकासाठी 'चीप पब्लिसिटी'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 01:18 PM2024-11-09T13:18:14+5:302024-11-09T13:20:40+5:30

Chhagan Bhujbal ED Controversy: राजदीप सरदेसाई यांनी २०२१ मध्येही एक दावा केला होता, नंतर तो दावा खोटा निघाल्याने त्यांनी माफीही मागितली होती

Allegations on Chhagan Bhujbal on ED by Rajdeep Sardesai Book is cheap publicity or obc related political stunt social media | भाजपाच्या प्रो-ओबीसी राजकारणाला तडा की पुस्तकासाठी 'चीप पब्लिसिटी'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

भाजपाच्या प्रो-ओबीसी राजकारणाला तडा की पुस्तकासाठी 'चीप पब्लिसिटी'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Chhagan Bhujbal ED Controversy: राजदीप सरदेसाई यांचे २०२४ लोकसभा निवडणुकीवर पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यात भुजबळांबद्दल मोठं विधान केलं आहे. “माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. ईडीपासून सुटका झाल्याने अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला” अशी प्रतिक्रिया भुजबळांनी वैयक्तिक चर्चेत दिल्याची नोंद सरदेसाई यांच्या पुस्तकात आहे. सोशल मीडियामध्ये यावरून चर्चा रंगल्या आहेत. राजदीप सरदेसाई यांची ही टीका फक्त राजकीय टिप्पणी आहे की सद्याच्या भाजपच्या ‘प्रो ओबीसी’ राजकारणाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न की पुस्तकासाठी चीप पब्लिसिटी? असा प्रश्न आता विचारला जातो आहे.

भुजबळांची प्रतिक्रिया

सरदेसाई यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही भाजपाबरोबर गेलो, असा आरोप आमच्यावर नेहमीच होत आले आहेत. तसेच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मला क्लीन चीट मिळाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मला क्लीन चीट मिळाली होती. याबद्दल मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पेढेही दिले होते. आम्ही विकासासाठी भाजपाबरोबर आलो होतो. महायुतीला पाठिंबा देण्यासाठी ५४ लोकांनी स्वाक्षरी केल्या होत्या. त्या सर्वांवर काय ईडीची चौकशी सुरू नव्हती. आम्ही फक्त मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील झालो होतो. त्याचा फायदा विकासासाठी आम्हाला झालेला आहे.”

निवडणुकीच्यावेळीच पुस्तक का?

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होवून पाच महिन्यांहून अधिकचा काळ उलटला आहे. आत्ता विधानसभा निवडणुका सुरु आहेत. हे पुस्तक याच वेळेत का प्रकाशित झाले? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “निवडणुकीच्या वेळेलाच हे का छापले जात आहे? याबद्दल मला आश्चर्य वाटते. मी ते पुस्तक वाचलेले नाही. त्यात काय लिहिलेले आहे? हे नंतर पाहीन. आता सध्या माझे लक्ष प्रचारावर आहे. तसेच आमच्या वकिलांशीही मी चर्चा करेन. निवडणुकीनंतर जे-जे चुकीचे आहे, त्यावर मी नक्कीच कारवाई करेन. नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडी घातलेल्या आहेत, त्याला निश्चितच आम्ही उत्तर देऊ.”

तटकरेंची प्रतिक्रिया

आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी कोणी कोणाचा वापर केला असेल तर आम्हाला त्याचा शोध घ्यावाच लागेल. कुणी कुणाला जास्त जवळ करत असेल तर आम्ही त्याचा शोध घेऊच. या पुस्तकातील आरोपांचा संबंध थेट भुजबळ यांच्याशी आहे. त्यामुळे या संदर्भात जी भूमिका घ्यायची असेल ती छगन भुजबळ घेतील. 

प्रो-ओबीसी राजकारणाला तडा देण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या भूमिका आरक्षणाच्या मुद्द्यावरुन परस्पर विरोधी आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. अनेकदा जरांगे यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत संबंध असल्याचे आरोप करण्यात आलेत. दुसरीकडे भाजपने आपला डीएनए ओबीसींचा असल्याचे अनेकदा म्हटले आहे. मराठा समाजाची मागणी ही ओबीसीतून आरक्षण मिळावी अशी आहे. ओबीसी नेत्यांचा याला विरोध आहे. त्यात यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. मराठा मतं लोकसभेत जशी एकगट्ठा होती, तशी ती विधानसभेत राहिलेली नाहीत. तुलनेत लोकसभेनंतर ओबीसी आंदोलन मजबूत होत गेले आहे.

छगन भुजबळ हे महायुतीचा एक भाग आहेत. ओबीसी आरक्षण रक्षणासाठी त्यांनी जरांगे यांच्याविरूद्ध मोठी भूमिका घेतली आहे. भुजबळांमुळे अजितदादा गटासह भाजपलाही ओबीसी मतं मिळतील अशी अपेक्षा आहे. अशात भाजपने ओबीसी नेते छगन भुजबळ यांना ईडीचा धाक दाखवून त्रास दिला, असं नरेटिव्ह उभं करण्याचं काम या पुस्तकातून होतं आहे. ओबीसी मतं भाजप आणि महायुतीपासून दूर नेण्यासाठी असं नरेटिव्ह उभं केलं जातंय का? असा प्रश्न सोशल मीडियामध्ये विचारला जातो आहे.

सरदेसाईंचं वादांसोबत नेहमीचं नातं?

राजदीप सरदेसाई यांचं त्यांच्या दीर्घ अनुभवाप्रमाणेच वादांसोबतही दीर्घ नातं राहिलेलं आहे. २०२१ला दिल्लीत शेतकरी आंदोलन घडलं. यावेळी प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी एका शेतकऱ्याला गोळी घालून ठार मारल्याचं ट्वीट सरदेसाई यांनी केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी टोकाची टीका केली होती. वास्तव पाहता, ही माहिती खोटी असल्याचं समोर आलं. यानंतर सरदेसाईंनी ट्वीट डिलीट केलं. त्यांच्यावर माध्यमसंस्थेने कारवाई करत दोन आठवड्यांसाठी निलंबनाची कारवाई केली होती. सरदेसाईंनी या घटनेची माफी मागितली होती. सरदेसाईंच्या विश्वासार्हतेवर वारंवार शंका उपस्थित केली जाते. अशा सरदेसाईंनी भुजबळांचा दाखला देत केलेल्या दाव्यात काही तथ्य नसल्याचे सूर उमटत असून ही केवळ पुस्तकासाठी करण्यात आलेली चीप पब्लिसिटी असल्याचे आरोप केले जात आहेत.

Web Title: Allegations on Chhagan Bhujbal on ED by Rajdeep Sardesai Book is cheap publicity or obc related political stunt social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.