भाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती! - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:17 AM2018-12-24T06:17:43+5:302018-12-24T06:19:31+5:30
भाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती आहे. युती असली, तरी भाजपा किंवा राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही.
कल्याण : भाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती आहे. युती असली, तरी भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. तो मी कधीही सोडणार नाही, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे केला.
विठ्ठलवाडी बस डेपोजवळच्या मैदानात उभारलेल्या गंगाधर पानतावणे साहित्यनगरीत अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनात ते बोलत होते. आठवले जातीयवादी पक्षासोबत असल्याने त्यांच्यावर समाजाचा रोष आहे. अंबरनाथ येथे भाजपाच्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याने आठवले यांना मारहाण केली होती. पक्षांतर्गत वाद हे मारहाणीचे कारण नसून, आठवले हे भाजपासोबत गेल्याने त्यांच्या विरोधात समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे, असे वक्तव्य आंबेडकरी विचारवंतांनी केले होेते. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी हा खुलासा केला.
आठवले म्हणाले की, ‘समाजातील प्राध्यापक, साहित्यिक यांच्यासोबत पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी बैठका घेऊनच भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यापुढेही सर्वांना विचारात घेऊ नच निर्णय घेतला जाईल,’ असे सांगताना ‘माझ्या हातात आहे झेंडा निळा, त्यामुळे अनेकांच्या पोटात उठला आहे गोळा,’ अशी कविताही त्यांनी केली. या प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रेय कांबळे, शिवसेना नगरसेवक नवीन गवळी यांचा आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संविधान बदलणाऱ्यांचे हात तोडू!
संविधान तयार झाल्यावर अन्याय-अत्याचार कमी झाले. संविधान बदलण्याचा कुणी प्रयत्न केला, तर त्यांचे हात तोडण्याचे काम आम्ही करू, असा इशारा आठवले यांनी या वेळी दिला. नदीजोड प्रकल्पाचे खरे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे साहित्यिकही होते. साहित्याचा वारसा त्यांनी खºया अर्थाने जपला. त्यामुळे साहित्यिकांचा मी आदर करतो. साहित्यिक माझा आदर करतात की नाही, ते मला ठाऊक नाही, असेही ते मिश्कीलपणे म्हणाले.