भाजपाशी युती हाच पर्याय! संभाजी ब्रिगेडला पुरुषोत्तम खेडेकर यांनी काय दिला राजकीय सल्ला? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 12:05 IST2021-09-16T12:00:01+5:302021-09-16T12:05:35+5:30
मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकाच्या संपादकीयमधून त्यांची भूमिका मांडली आहे.

भाजपाशी युती हाच पर्याय! संभाजी ब्रिगेडला पुरुषोत्तम खेडेकर यांनी काय दिला राजकीय सल्ला? वाचा
मुंबई – आगामी काळात राज्यात संभाजी ब्रिगेड आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आल्यास नवल वाटायला नको. कारण मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडला राजकीय सल्ला दिला आहे. भाजपाशी युती हाच पर्याय अशा शब्दात खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडला सूचवलं आहे. मात्र त्याबाबत संभाजी ब्रिगेडने निर्णय घ्यावा असंही त्यांनी सांगितले आहे.
मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकाच्या संपादकीयमधून त्यांची भूमिका मांडली आहे. या लेखात पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात की, युवक आणि महिला यांना आकर्षित करण्यासाठी भविष्यकाळात ऊर्जेची गरज आहे. आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी धडपड सुरू पाहिजे. पैशाचे सोंग करता येत नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे विचित्र समीकरण झाले आहे. हे बदलायचे असेल तर संभाजी ब्रिगेड राजसत्तेत आणणे गरजेचे आहे. संभाजी ब्रिगेडचे सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी राजनैतिक संबधात वाढ वा युती याबाबत गंभीरपणे विचार करावा लागेल. महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी(NCP-Shivsena-Congress) या तिन्ही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिग्रेडला दूर ठेऊन केवळ त्यांच्या नावाचा व कामाचा एकतर्फी लाभ घेणे आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहित धरून आहेत असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ? संभाजी ब्रिगेडचे भारतीय जनता पार्टीसोबत युतीचे संकेत
तसेच भाजपा(BJP) सत्तेत आली तरी हरकत नाही, पण संभाजी ब्रिगेडला(Sambhaji Briged) सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी या तिन्ही पक्षांची मानसिकता आहे. तर काही लहान पक्षनेते संभाजी ब्रिगेडबाबत गैरसमज पसरवत असतात. या परिस्थितीत संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगेडला खूप मर्यादा येतात. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपा युती हाच पर्याय उरतो. तसे संभाजी ब्रिगेडपेक्षा वेगळ्याच अर्थाने भाजपाला अस्पृश्य मानले जाते. मराठा सेवा संघ आणि RSS यांची तत्वे पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. परंतु राजकारणात अंतिम यश मिळणे हेच एकमेव तत्व असते. याठिकाणी कोणीही कायमस्वरुपी मित्र व शत्रू नसतात. वेळ आणि संधी हेच राजकीय सत्य आहे. लोक काय म्हणतील यावर राजकारण केले जात नाही. शिवसेना-भाजपा आज राणे प्रकरणामुळे एकमेकांचे कट्टर शत्रू झालेत. पण सोन्याचे अंडे देणारी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी ते पुन्हा एकत्र येऊ शकतात. त्यासाठी तडजोड होऊ शकते असंही पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सध्या महाविकास आघाडी सरकार उदाहरण आहे. आता स्वबळावर राजकारण हे मत भूतकाळ जमा झाले. पहिले प्राधान्य समविचारी पक्षांनाच आपला स्वाभिमान सांभाळून देणे याबाबत दुमत नाही. पण जमलेच नाही परस्परविरोधी पक्षासोबत युती व वाटाघाटी करुन योग्य निर्णय घ्यावा लागतो. गेल्या काही वर्षापासून तत्ववादी मोठमोठे राजकीय नेते तसेच पक्ष तत्व व आदर्श गुंडाळून राजकारण साधत आहेत. आजतरी संभाजी ब्रिगेडला सत्तेसाठी काही ना काही तडजोड करावीच लागेल. याबाबत गंभीरपणे विचार करुन योग्य भूमिका आणि निर्णय घ्यावा ही सूचना आहे. संभाजी ब्रिगेड हा सर्वच राजकीय पक्षांना जबरदस्त पर्याय आहे. संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते यांनी आपली सर्वच ताकद वाढवलीच पाहिजेत. स्वबळावर वा युतीत जास्तीत जास्त जागा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जिंकल्या पाहिजेत. त्यासाठी पुढील काळात फक्त आणि फक्त १०० टक्के राजकारण करावे कारण राजकारण हेच समाजकारणाचे अंतिम उदिष्ट आहे असा राजकीय सल्ला पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडला दिला आहे.