युती आघाडीतील उमेदवार आमने-सामने
By Admin | Published: February 7, 2017 04:20 AM2017-02-07T04:20:04+5:302017-02-07T04:20:04+5:30
इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षाच्या अधिकृत उमेदवारी अर्जाची प्रतीक्षा करावी लागली
आविष्कार देसाई , अलिबाग
इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पक्षाच्या अधिकृत उमेदवारी अर्जाची प्रतीक्षा करावी लागली. उमेदवारी मिळाल्याने युती आघाडीतील उमेदवार निवडणुकीसाठी आमने-सामने आहेत. यातून एकाला माघार घ्यावी लागणार आहे मात्र माघार घेतली नाही, तर युती आघाडीचा धर्म या निवडणुकीत न पाळल्याचे उघड होऊन त्याचा फायदा विरोधी उमेदवारांना होणार असल्याचे दिसून येते.
अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ३९ तर, पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ६६ असे एकूण १०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने चेंढरे पंचायत समिती गणासाठी अॅड.जनार्दन पाटील यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली, परंतु आघाडातील घटक पक्ष असणाऱ्या शेकापनेही तेथे अधिकृत उमेदवार उभा करुन आव्हान उभे केले आहे. तीच परिस्थिती कुडूर्स पंचायत समिती गणात राष्ट्रवादीला अलविदा करुन शिवसेनेत गेलेले राजा केणी यांची झाली आहे. तेथेही त्यांच्या आघाडीतील काँग्रेसने आधीच उमेदवार उभा केला आहे. राजा केणी उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी शिवसेनेत दाखल झाले.
अलिबाग तालुक्यातून प्रामुख्याने थळ जिल्हा परिषद मतदार संघात शेकापच्या चित्रा पाटील यांनी, तर शिवसेनेच्या मानसी दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. चित्रा पाटील यांनी याआधीही कुडूर्स जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या मानसी दळवी यांना टक्कर देण्यासाठी त्यांना पक्षाने निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
जिल्ह्यामध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झाली आहे. अलिबागमध्ये शेकापने राष्ट्रवादीला एकही जागा सोडलेली नाही. थळ मतदार संघ हा राष्ट्रवादीचा आहे, परंतु त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीने तेथे काही रस दाखविला नाही. युती असल्याने किमान पंचायत समितीच्या दोन जागा मिळाव्यात अशी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची इच्छा होती. चेंढरे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे जनार्दन पाटील हे पत्नीसाठी, तर कुडूर्स पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजा केणी इच्छुक होते. मात्र सुनील तटकरे यांच्याकडून स्पष्ट संकेत त्यांना मिळत नव्हते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ येत होती, तशी त्यांची धाकधूक वाढत होती. उमेदवारी न मिळाल्याने अखेर राजा केणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत दाखल होण्याचे जाहीर केले. जनार्दन पाटील हे पक्ष सोडून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास तयार झाले होते. मात्र शेवटचा उपाय म्हणून त्यांनी पुन्हा सुनील तटकरे यांना साकडे घातले. राष्ट्रवादी अलिबाग तालुक्यात शाबूत ठेवायची असेल, तर कार्यकर्ते पदाधिकारी यांचा विचार केलाच पाहिजे म्हणून तटकरे यांनी पाटील यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली असल्याचे बोलले जाते.
सोमवारी पाटील यांनी पत्नी सुलभा पाटील यांचा अर्ज दाखल केला. त्याचबरोबर शेकापनेही स्वाती पाटील यांना अधिकृत उमेदवारी देत अर्ज दाखल केला. महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनीही चेंढरेमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे युती आघाडीतील उमेदवार आमने-सामने आहेत. दुसरीकडे राजा केणी यांनाही शिवसेनेने कुडूर्स पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवारी देत त्यांचाही अर्ज दाखल केला. काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची आघाडी आहे. विशेष म्हणजे याच कुडूर्स पंचायत समिती मतदार संघातून काँग्रेसने अनंत पाटील यांना अधिकृत उमेदवारी आधीच दिली आहे. त्यामुळे चेंढरे, कुडूर्स पंचायत समिती गणातून प्रत्येकी एका उमेदवाराला माघार घ्यावी लागणार आहे. तसे न झाल्यास विरोधी उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे.