आघाडी-युतीची खिचडी!
By admin | Published: March 22, 2017 02:49 AM2017-03-22T02:49:29+5:302017-03-22T02:49:37+5:30
राज्यातील पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत कुठे शिवसेना-काँग्रेस, कुठे भाजपा-काँग्रेस तर कुठे शिवसेना-राष्ट्रवादी वा भाजपा-राष्ट्रवादी
मुंबई : राज्यातील पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत कुठे शिवसेना-काँग्रेस, कुठे भाजपा-काँग्रेस तर कुठे शिवसेना-राष्ट्रवादी वा भाजपा-राष्ट्रवादी अशी राजकीय खिचडी शिजल्याने पक्षनिष्ठा आणि तत्वांवर पाणी सोडण्यात आले. सत्तेसाठी राजकीय मतभेदाच्या भिंती ओलांडताना सर्वांनीच सोयीनुसार भूमिका घेतली. त्यामुळे बहुमत हाती असतानाही बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले, तर सोलापुरात सर्वांच्या भांडणात अपक्षांची लॉटरी लागली.
नाशिकमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर सेनेचा अध्यक्ष, कोल्हापूर, सांगलीत इतिहास घडवित भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढले. बीडमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले प्रतिस्पर्धी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मात करीत भाजपाकडे अध्यक्षपद खेचून आणले. शिवाय माजी राज्यमंत्री सुरेश धस यांची सोबत घेत राष्ट्रवादीलाही सुरुंग लावला.
बुलडाण्यात भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता आली तर यवतमाळमध्ये भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले. औरंगाबादमध्ये शिवसेना-काँग्रेस युतीची सत्ता आली.
भाजपाला सर्वाधिक जागा असूनही प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या जालन्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी-अपक्षांनी एकत्र येत भाजपाला शह दिला. शिवसेनेला केवळ रत्नागिरीत एकहाती सत्ता मिळाली. अन्य चार ठिकाणी ते काँग्रेस, राष्ट्रवादी वा दोघांचीही सोबत त्यांनी घेतली. अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे अध्यक्षपदी निवडून आल्या.
उस्मानाबादेत भाजपा व शिवसेनेच्या काही सदस्यांनी मतदानावेळी गैरहजर राहत राष्ट्रवादीचा विजयाचा मार्ग सुकर केला. भाजपा-शिवसेनेतील भांडणात राष्ट्रवादीचे सर्वाधिक नऊ उपाध्यक्ष निवडून आले. बीड जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाने व्यथित झालेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. सर्वाधिक जागा (पान २ वर )
रायगडमध्ये अदिती तटकरे
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे, तर उपाध्यक्षपदी शेकापचे आस्वाद पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेनेने अध्यक्षपदासाठी स्वाती नवगणे आणि उपाध्यक्षपदासाठी सुरेंद्र म्हात्रे यांचे अर्ज दाखल केले होते. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बहुमतासाठी पुरेसे असल्याने शिवसेनेचा पराभव झाला.