युती अधांतरीच ! युती नको भाजपात सूर

By admin | Published: January 13, 2017 05:13 AM2017-01-13T05:13:45+5:302017-01-13T05:13:45+5:30

‘ती’ सध्या काय करते? या परवलीच्या बनलेल्या प्रश्नाप्रमाणेच ‘युती सध्या काय करते?’ हा प्रश्नदेखील सगळीकडे

Alliance in the coalition! Do not join the party | युती अधांतरीच ! युती नको भाजपात सूर

युती अधांतरीच ! युती नको भाजपात सूर

Next

मुंबई/ठाणे : ‘ती’ सध्या काय करते? या परवलीच्या बनलेल्या प्रश्नाप्रमाणेच ‘युती सध्या काय करते?’ हा प्रश्नदेखील सगळीकडे तितक्याच औत्सुकतेने विचारला जात आहे. गंमत अशी की, ज्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे, तीच मंडळी एकमेकांना हा प्रश्न विचारताना दिसत आहे! शिवसेना मुंबईच्या महापौरपदावर ठाम आहे. त्यामुळे राज्यातील
१० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांचा बिगुल वाजून ४८ तास उलटले तरी युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकांकरिता शिवसेनेसोबत युती करण्याबाबत वाटाघाटी सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये युतीच्या कुबड्या हव्या कशाला? अशी
तीव्र भावना आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या प्रवेशद्वाराबाहेर लागलेल्या फलकांपासून व्यासपीठामागे लावलेल्या बॅनरपर्यंत आणि काही पदाधिकाऱ्यांच्या भाषणांतून स्वबळाचा नारा देण्याकरिता कार्यकर्ते किती आसुसलेले आहेत, याचेच प्रत्यंतर आले.
प्रदीर्घ काळानंतर कार्यकारिणीची बैठक ठाण्यात झाली. प्रदेश कार्यकारिणीपूर्वी ठाण्याची
जिल्हा कार्यकारिणी बैठक झाली. त्यातही स्वबळावर निवडणूक लढण्याचाच ठराव मंजूर केला गेला. या वेळी बोलताना शहराध्यक्ष संदीप लेले यांनी मोकळेपणाने लढण्याची संधी दिली तर ताकद दाखवू, असा निर्धार व्यक्त केला.
लेले यांचाच सूर पक्षाचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांनी प्रदेश कार्यकारिणीत लावला. शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडलेल्या राजकीय ठरावात केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला गेला.
याच ठरावावर बोलताना चव्हाण यांनी आता सरकारच्या या यशात आम्हाला कुणीही वाटेकरी नको आहे. व्यासपीठाच्या मागील बाजूला ‘सारा महाराष्ट्र जिंकू या’, असा बॅनर लावला होता. त्याच्याकडे बोट दाखवत चव्हाण म्हणाले की, आपल्याला सारा महाराष्ट्र जिंकायचा आहे, अर्धा नाही. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळी याच चव्हाण यांनी प्रदेश कार्यकारिणीत तीन पायांची शर्यत संपवा, असे सांगत युती तोडण्याची भाषा केली होती.
भाजपाच्या अनेक नेत्यांना युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, युती करताना पहिली चर्चा ही जागावाटपावर होते. त्यानंतर, काही विशिष्ट जागांवर होते.  विधानसभा निवडणुकीत भाजपाची वाढलेली ताकद पाहता आम्ही निम्म्या जागांच्या खाली जागा घेणार नाही आणि शिवसेना तेवढ्या जागा सोडायला तयार होण्याची शक्यता नाही.  शिवाय, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने युतीचे जागावाटप तत्पूर्वी होणे कठीण आहे.  मात्र, भाजपाला युती नको, हा संदेश जाऊ नये, याकरिता आम्ही चर्चेची तयारी दाखवली आहे. अर्थात, ज्या जिल्हा परिषदांच्या क्षेत्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ आहेत, अशा ठिकाणी युती होईल, असे संकेत त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
बॅनर्सचा बोलबाला
या बैठकीच्या ठिकाणी रस्त्यावर  ‘युती नको, विकास हवा’, ‘ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवा’, ‘मोदी-फडणवीसांचा कारभार ठरला राज्यात नंबर वन, नको कुबडी युतीची, करा तयारी एकहाती विजयाची’... असा निर्धार व्यक्त करणारे बॅनर सकाळपासून लागले होते. बैठकीला येणारे नेते व पदाधिकारी क्षणभर थांबून हे बॅनर्स वाचत होते. हे बॅनर्स भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचे नेते खासगीत मान्य करीत होते.

Web Title: Alliance in the coalition! Do not join the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.