सर्वांगीण विकासासाठी आघाडी कटिबद्ध
By Admin | Published: April 5, 2017 03:24 AM2017-04-05T03:24:01+5:302017-04-05T03:24:01+5:30
रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आले आहेत.
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आले आहेत. तीनही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्रित विचारधारेतूनच शिवतीर्थावर सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसला सर्वाधिक महत्त्वाचे असे आघाडीचे प्रतोदपद दिले आहे. त्यामुळे विविध पदवाटपात काँग्रेसमध्ये नाराजी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी सांगितले.
रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या आघाडीच्या प्रतोदपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाजीराव परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध विषय समितींचे सभापती, तसेच आघाडीच्या प्रतोदपदी कोणाची निवड करायची? याचा निर्णय हा शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रित घेतला आहे. काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती. त्यामुळे ते आमच्यासोबत सत्तेमध्ये आहेत. आता त्यांच्या वाट्याला सभापतीपद आले नसले, तरी आगामी काळात त्यांना सभापतीपद देण्याबाबत आघाडीचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही, असेही अदिती यांनी स्पष्ट केले.
आम्ही एकत्र काम करणार
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी कटिबद्ध आहे. विकासाच्या सर्व योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही एकत्रित काम करणार आहोत, असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.