मुंबईसाठी युतीची समन्वय समिती
By Admin | Published: August 9, 2016 04:39 AM2016-08-09T04:39:49+5:302016-08-09T07:20:19+5:30
पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध दंड थोपटत असतानाच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई : पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध दंड थोपटत असतानाच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुंबईतील नागरी प्रश्न, विशेषत: गृहनिर्माण प्रकल्प (एसआरए, बीडीडी चाळ पुनर्विकास, धारावी पुनर्विकास आदी) तसेच मुंबईच्या विकास आराखड्यासंदर्भात (डीपी) भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पक्षांचे मुंबईतील काही मंत्रीदेखील या समितीमध्ये असतील. या समितीच्या नियमित बैठका होतील.
भाजपाचे मंत्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामे करीत नाहीत, शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये पुरेसा निधी वा योजना दिल्या जात नाहीत, अशी तक्रार अलीकडे पक्षाच्या प्रतोदांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एका बैठकीत केली होती. या तक्रारीची दखल घेत याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर प्रतोदांची बैठक घेण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते.
त्यानुसार आज उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे, शंभूराजे देसाई, संजय शिरसाठ, सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक हे पक्षाचे प्रतोद आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दीड तास बैठक झाली. सर्व प्रतोदांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या.
या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना भाजपाकडील कोणत्या खात्यांमधून पुरेसा निधी मिळत नाही, याची माहिती प्रतोदांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर आपण त्या मंत्र्यांशी व्यक्तिश: बोलू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे आम्हाला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्याबाबत तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याची भावना प्रतोदांनी सोमवारच्या बैठकीत मांडली. याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी
दिले. सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा व स्वच्छता ही दोन्ही खाती भाजपाकडे आहेत. आमदारांच्या अडकलेल्या कामांची यादी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली. शिवसेनेच्या आमदारांच्या विभागवार बैठका घेऊन त्यांच्या समस्या मुख्यमंत्री सोडविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)