युती...अवघड जागेचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 01:07 AM2017-01-28T01:07:03+5:302017-01-28T01:07:03+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह अन्य महापालिकांमधील युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Alliance ... difficult space | युती...अवघड जागेचे दुखणे

युती...अवघड जागेचे दुखणे

Next

संदीप प्रधान / मुंबई
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह अन्य महापालिकांमधील युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. गेली काही दिवस या दोन पक्षांमधील वाटाघाटी ज्या पद्धतीने सुरू होत्या, ते पाहता, हे तर होणारच होते. राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडलेली नाही आणि निवडणुकीपूर्वी बाहेर पडण्याची शक्यताही दिसत नाही. त्यामुळे युती तोडण्याचा हा निर्णय तत्कालीक व सोईस्कर आहे. निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापन करताना एकमेकांची गरज लागली, तर लागलीच समविचारी पक्ष या नात्याने दोन्ही पक्ष एकत्र येतील. त्या वेळी महापौरपदापासून स्थायी समितीच्या पदापर्यंत वाटाघाटी, रुसवेफुगवे पाहायला मिळतील. मात्र, अखेर दोन्ही पक्ष गळ््यात गळे घालतील. निवडणुकीत अशी विखारी भाषणे करायचीच असतात व नंतर ती विसरायची असतात, अशी निलाजरी कबुलीही देतील. पुन्हा स्थायी समितीमधील सर्वपक्षीय सिंडीकेट सक्रिय होईल आणि पारदर्शक कारभाराची पुढील पाच वर्षे कुणाला आठवण येणार नाही.
यापूर्वी १९९२ मध्ये अशीच मुंबई महापालिका निवडणुकीत युती तुटली होती. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून वेगळे होत असल्याचे जाहीर केले. मात्र, ते मतदारांना रुचले नाही. तेव्हा महापालिकेत काँग्रेस-रिपाइंची सत्ता आली होती, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या विभक्त होण्याला पार्श्वभूमी १९९०च्या विधानसभा निवडणुकीची होती. त्या वेळी राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतामधील सरकार सत्तारूढ झाले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी पवार यांचे संबंध बिघडल्यामुळे राज्यात अल्पमतामधील सरकार आणून पवार यांनी आपले महत्त्व वाढवल्याची चर्चा त्या वेळी होती. शिवसेनेचे मनोहर जोशी हे विरोधी पक्षनेते झाले, ते याच वर्षी आणि त्यामुळे छगन भुजबळ नाराज होऊन शिवसेनेत फुटीची बिजे रोवली गेली, तीही त्याच वर्षी. देशातील हिंदुत्वाचा झंझावात त्या वेळी उन्मादक अवस्थेत होता आणि सत्ता शिवसेना-भाजपाला दिसू लागली होती. त्यामुळे आपापल्या ताकदीचा अंदाज १९९२ च्या महापालिका निवडणुकीत घेतला गेला. हा इतिहास नमूद करण्यामागील हेतू हाच आहे की, मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेचा प्राण आहे. ही सत्ता नसेल, तर शिवसेना गलितगात्र होते. या वेळी पुन्हा शिवसेनेच्या गंडस्थळावर हल्ला केला जात असून, हा हल्लेखोर शिवसेनेचा २५ वर्षांचा मित्रपक्ष भाजपा आहे.
बाबरी मशिदीच्या पतनानंतर १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. या सरकारच्या काळात युतीमधील संघर्ष अनेकदा उफाळून आला. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत सरकारबद्दल अँटी इन्कम्बन्सी असतानाही युतीच्या जागा १३ ने कमी झाल्या होत्या. त्यात भाजपाच्या जागा गतवेळीपेक्षा ९ने तर शिवसेनेच्या जागा गतवेळीपेक्षा ४ने घटल्या होत्या. तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी सत्ता स्थापनेसाठी तीनदा संधी दिली. मात्र, नारायण राणे व गोपीनाथ मुंडे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या संघर्षात पुन्हा युतीचे सरकार आले नाही. एकाच विचारधारेच्या दोन पक्षांत सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती असावी, यावरून सुरू असलेला संघर्ष जुना आहे. त्यामुळे २५ वर्षे युती करून सडलो, हे उद्धव ठाकरे यांचे विधान अर्धसत्य आहे. युती नसती, तर सत्ता दिसली नसती आणि सत्ता दिसली नसती, तर युतीमध्ये सडल्याची भावना प्रबळ झाली नसती.

Web Title: Alliance ... difficult space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.