नगरपालिकांत युतीचा फार्स
By admin | Published: October 28, 2016 05:17 AM2016-10-28T05:17:52+5:302016-10-28T05:17:52+5:30
राज्यातील २१२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीची घोषणा झाली असली तरी, हा निव्वळ फार्स असूृन दोन्ही पक्षांनी ‘एबी’ वाटप केल्यानंतर नेत्यांना उशिरा जाग आली आहे.
- यदु जोशी, मुंबई
राज्यातील २१२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीची घोषणा झाली असली तरी, हा निव्वळ फार्स असूृन दोन्ही पक्षांनी ‘एबी’ वाटप केल्यानंतर नेत्यांना उशिरा जाग आली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, शिवसेनेचे खा. संजय राऊत आणि खा. विनायक राऊत यांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. मात्र, युतीमध्ये कोणता पक्ष कोणकोणत्या नगराध्यक्षपदांसाठी लढणार, कोणत्या नगरपालिकांमध्ये किती जागा वाटून घेतल्या आहेत, याची कोणतीही माहिती दिली गेली नाही.
आधी मात्र केली स्वबळाची भाषा
मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पक्षाच्या विभागीय मेळाव्यात स्वबळाची भाषा करत या निवडणुकीत युती-आघाडीची भानगड राहणार नाही, असे कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले होते.
असे असताना केवळ शिवसेनेच्या समाधानासाठी दोन दिवस आधी भाजपाने युतीचे नाटक केल्याचे म्हटले जात आहे.
नाटक टाळायला हवे होते
शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाला गळ घालून कोणत्याही परिस्थितीत
पालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा करा, असा आग्रह धरला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते गोंधळात
राज्यपातळीवर युती झाल्याचे जाहीर करताना युतीबाबतचा निर्णय मात्र स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे नेते घेतील आणि ते तिढा सोडवू शकले नाहीत तर दोन्ही पक्षांचे प्रदेश पातळीवरील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेईल, असे सांगून दानवे आणि राऊत यांनी कार्यकर्त्यांना आणखी गोंधळात टाकले आहे.
युतीच्या घोषणेला एवढा उशीर का, असे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केल्यानंतर युतीचा निर्णय झाला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपावाले किमान दीडशे जागा मागतील. त्यामुळे युती होण्याची शक्यता नाही. असे असताना स्थानिक कार्यकर्त्यांना उभे करायचे तर नगरपालिका निवडणुकीत युतीचे नाटक टाळायला हवे होते, असा शिवसेनेत सूर आहे.
147नगरपालिकांचे नगराध्यक्ष व नगरसेवक, तसेच १८ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ आॅक्टोबर आहे.