युती-आघाडीचा घरोबा!

By admin | Published: April 25, 2015 04:01 AM2015-04-25T04:01:09+5:302015-04-25T04:01:09+5:30

सांगलीत काँग्रेसअंतर्गत वाद उफाळून आला. माजी मंत्री आ. पतंगराव कदम गटाला वगळून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व काँग्रेसमधील माजी मंत्री मदन पाटील

Alliance-Frontage Ghora! | युती-आघाडीचा घरोबा!

युती-आघाडीचा घरोबा!

Next

मुंबई : राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्याचे जिल्हा बँकांच्या निवडणुकीच्या राजकारणातही प्रतिबिंब उमटले असून अनेक ठिकाणी भाजपा व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गजांनी पॅनलची निर्मिती केली. त्याचवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी बहुसंख्य बँकांमध्ये संचालक बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. राज्यातील विविध बँकांमध्ये मिळून सुमारे ५० संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.
सांगलीत काँग्रेसमध्ये फूट
सांगलीत काँग्रेसअंतर्गत वाद उफाळून आला. माजी मंत्री आ. पतंगराव कदम गटाला वगळून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व काँग्रेसमधील माजी मंत्री मदन पाटील गटाने एकत्रित येत सर्वपक्षीय आघाडी केली. राष्ट्रवादीच्या वाट्याला १५, काँग्रेस २, भाजपा ३ असा फॉर्म्युला निश्चित झाला. त्यानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांनी शेतकरी सहकार पॅनेलची घोषणा केली. २१ जागांसाठी ५ मे रोजी मतदान होईल.
साताऱ्यात ७ बिनविरोध
साताऱ्यात एक खासदार व दोन आमदारांसह सात उमेदवार बिनविरोध निवडले गेले. खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे, बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, आ. प्रभाकर घार्गे, माजी आ. विक्रमसिंह पाटणकर, राजेंद्र राजापुरे आणि अनिल देसाई बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसचे आ.जयकुमार गोरे यांचे पॅनेल उभे राहू शकते.
अकोल्यात ३९ उमेदवारांची माघार
अकोला व वाशिम बँकेत शुक्रवारी ३९ जणांनी अर्ज मागे घेतले. ११ जणांची अविरोध निवड झाली. ९ मतदारसंघांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. ५ मे रोजी मतदान होईल.
नाशिकमध्ये ५ बिनविरोध
५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सोसायटी गटातून पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. आ. सीमा हिरे, जे. पी. गावित, माजी आ. दिलीप बनकर, केदा अहेर, परवेझ कोकणी, प्रिया वडजे रिंगणात उतरले आहेत.
थोरात-विखे गटात लढत
अहमदनगर बँकेत अखेरच्या दिवशी २१३ पैकी १८४ जणांनी अर्ज मागे घेतले. आधी दोन आणि शुक्रवारी चार संचालकांची बिनविरोध निवड झाली. १५ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसमधील राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात गटाने एकत्र येण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. राष्ट्रवादी आधीच थोरात गटासोबत असून भाजपाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. आ. शिवाजी कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आ. राजीव राजळे, चंद्रशेखर घुले, अरूण तनपुरे आणि विद्यमान उपाध्यक्ष उदय शेळके बिनविरोध निवडून आले आहेत.
धुळ्याच्या खासदारांची माघार
धुळे-नंदुरबार बँकेत १५ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहे. शुक्रवारी माघार घेणाऱ्यामध्ये खा. डॉ.सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, तेजस गोटे यांची नावे आहेत.
गडचिरोलीत २० जण अविरोध
गडचिरोलीत २० संचालक अविरोध निवडून आले आहे. ओबीसी प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात असल्याने २६ एप्रिल रोजी मतदान होईल.
अकोल्यात ११ बिनविरोध
अकोला-वाशिम जिल्ह्यात ३९ जणांनी अर्ज मागे घेतले. ११ जणांची अविरोध निवड झाली. आता ९ मतदारसंघात २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
१७ जागांसाठी ३५ उमेदवार
सांगली : सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीत शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दोघांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता बँकेच्या १७ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, सतीश पाटील हे एकमेव अपक्ष आहेत. पुजारी व गाडगीळ या दोन पॅनेलमध्ये सरळ लढत होणार आहे.
रत्नागिरीत दुरंगी लढत
महत्त्वाच्या उमेदवाराने माघार न घेतल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपाचे सहकार पॅनेल आणि शिवसेनेचे शिवसंकल्प पॅनेल यांच्यातील दुरंगी लढत कायम आहे.
सिंधुदुर्गात काँग्रेसमध्ये बंडखोरी
मध्यवर्ती बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमधून ४१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता ८७ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, भाजपा व सहकार क्षेत्रात इतर सभासदांनी केलेल्या सहकार वैभव पॅनेल विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी यांच्यात जोरदार लढत होेणार आहे. पाच उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने काँग्रेसला बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Alliance-Frontage Ghora!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.