टोलमुक्तीशी युती सरकार बांधील
By admin | Published: January 10, 2015 12:48 AM2015-01-10T00:48:47+5:302015-01-10T00:50:25+5:30
चंद्रकांत पाटील : कोल्हापूरच्या टोलप्रश्नी अनेक अडचणी, तरीही सोडवणारच
कोल्हापूर : स्व. गोपीनाथ मुंडे यांचे महाराष्ट्र टोलमुक्तीच्या स्वप्नाशी राज्यातील युतीचे सरकार बांधील आहे. वेळ लागेल; पण टोलबाबत योग्य निर्णय होईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूरचा टोल ‘आयआरबी’ सहजासहजी सोडणार नाही. अडचणी अनेक आहेत; तरीही हा प्रश्न सोडवणारच, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मंत्री पाटील म्हणाले, राज्यात पंधरा-पंधरा वर्षांचे जटील विषय आहेत. सरकार येऊन जेमतेम ६९ दिवस झाले. प्रश्न सोडविण्यासाठी थोडा वेळ लागणारच. टोलबाबत सरकारने काही निर्णय घेतला की कंपनी थेट न्यायालयात जाते. खारघरचा टोल बंदचा निर्णय घेतला. कंपनी न्यायालयात गेली; त्यामुळे तो पुन्हा सुरू झाला.
मग न्यायालयाचा अवमान करायचा का? १२३ ठिकाणी टोलप्रश्न आहे. एक-एक करीत टोल घेऊन त्यांचा करार, मुदतीची माहिती घेऊन प्रश्न मार्गी लावू. सरकारपुढे केवळ टोलचा प्रश्न नाही. दुष्काळग्रस्तांसाठीचे पॅकेज, साखर कारखानदारांसह इतर प्रश्नही आहेत. अवजड वाहनांकडून जादा टोल घेऊन चारचाकींना वगळण्याचे धोरण केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सहा सी.एं. (चार्टर्ड अकौंटट)ची कमिटी नेमली असून, त्यांच्यामार्फत टोलच्या भौगोलिक कार्यक्षेत्राचा अभ्यास करून मुदत पूर्ण होत आलेले टोलनाके बंद करताना किती रक्कम संबंधित कंपनीला द्यावी लागणार, याचा अहवाल मागविला आहे.
टोलबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यांची बांधकाम विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या टोलचा पेच आहे. २२० कोटी प्रकल्पाच्या खर्चाला मान्यता आहे; पण ‘आयआरबी’ कंपनी ४०० कोटी खर्च केल्याचा दावा करीत आहे.
वाढीव खर्चाची मान्यता यांसह विविध मुद्द्यांवर कंपनी भांडणार आहे. यातून मार्ग काढावा लागणार आहे.
‘अडत’बाबत गुरुवारी बैठक
अडत्या जोखीम घेऊन शेतकऱ्यांना पैसे, तर व्यापाऱ्यांना माल देतो. त्यामुळे त्याला अडत दिली पाहिजे; पण ती कशी देता येईल, याबाबत वाशी बाजार समितीमधील अडत्यांशी चर्चा केली आहे. पुणे, नाशिक समित्यांमध्येही जाणार आहे. याबाबत गुरुवारी (दि. १५) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निर्णय होणार हे माहीत असल्याने लगेच २१ जानेवारीची बैठक बोलावली असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
काँगे्रसचे सरकार पळपुटे !
कॉँग्रेस आघाडी सरकारने केलेल्या घोषणांची आम्ही पूर्तता करीत आहोत. राज्यावर ३ लाख ८४ हजार कोटींचे कर्ज करून कॉँग्रेस पळून गेली आहे; पण आम्ही पळ काढणारे नाही. यातून मार्ग काढून दिलेली आश्वासने पूर्ण करू, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.