आघाडी सरकार ‘संभाजीनगर’चा निर्णय घेणार : देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 01:46 AM2021-01-17T01:46:14+5:302021-01-17T01:46:18+5:30
आघाडी सरकार लवकरच संभाजीनगरचा प्रस्ताव मंजूर करेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
औरंगाबाद :शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २५ वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर केले होते. अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब सेक्युलर होता का? असा प्रश्न उपस्थित करून आपली भूमिका मांडली आहे. आघाडी सरकार लवकरच संभाजीनगरचा प्रस्ताव मंजूर करेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. शिवसेनेच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्ताक अहेमद यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा अवमान असल्याचे नमूद केले.
पालकमंत्री यांच्या हस्ते शनिवारी सकाळी विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शहरातील १५ लाख नागरिकांनी संभाजीनगर म्हटले पाहिजे. शहराला सुपर संभाजीनगर करण्याचा आमचा मानस आहे. लवकरच महाविकास आघाडी सरकार यासंदर्भात निर्णय घेईल. भाजपने शनिवारी शहरात नमस्ते संभाजीनगर असे होर्डिंग लावले होते, त्याचे पालकमंत्र्यांनी स्वागत केले.