युतीच्या डोक्यात सत्ता गेलीय
By admin | Published: February 28, 2016 03:59 AM2016-02-28T03:59:44+5:302016-02-28T03:59:44+5:30
सत्ताधारी भाजपा सरकारवर जनता नाराज असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपाकडून देशद्रोह व राष्ट्रभक्तीसारखे मुद्दे बाहेर काढले जात असल्याची टीका राष्ट्रवादी
मुंबई : सत्ताधारी भाजपा सरकारवर जनता नाराज असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपाकडून देशद्रोह व राष्ट्रभक्तीसारखे मुद्दे बाहेर काढले जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. सत्ता येते व जाते, त्यामुळे आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवायचे असतात. सत्तेची हवा डोक्यात जाऊ द्यायची नसते, असा टोलाही या वेळी त्यांनी शिवसेना-भाजपा सरकारला लगावला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. केंद्रात सत्ता असताना आणि मोठी पॅकेज जाहीर करूनही बिहारमध्ये आणि दिल्लीत भाजपाचा पराभव झाला. पंतप्रधान मोदींच्या लाख कोटींच्या आकड्यांना बिहारची जनता भुलली नाही. आगामी निवडणुका होत असलेल्या राज्यातही पराभव समोर दिसत असल्याने देशात दुहीची किंवा हिंदुत्ववादाची बीजे पेरून भाजपा निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खा. पवार यांनी केला.
वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू असून, सत्तेच्या आधारे वेगळ्या विचारांच्या नेत्यांना संपवायचे काम सुरू आहे. सत्ता येताच सत्ताधारी पक्षाचे लोक पोलीस दलावर हल्ला करू लागले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
हिंदू विरुद्ध मुस्लीम, दलित विरुद्ध अदलित असे वाद निर्माण करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्याचे काम सुरू आहे. मराठवाड्यात पाणी नाही. सरकार लोकांना पिण्याचे पाणी देऊ शकत नाही. मग मराठवाड्यातली लोक जगणार कसे असा सवाल त्यांनी केला. गोमातेला वाचवा म्हणायचे, तिच्या नावाने राजकारण करायचे आणि गोमातेला चारा मात्र द्यायचा नाही, असे सांगत, या सरकारमध्ये गोमातेला चारा द्यायची दानत नसल्याची टीकाही खा.पवार यांनी केली.
हैदराबाद विद्यापीठात देशविरोधी कारवाई करणारी टोळी आहे. असे सांगत केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी पत्र लिहून देशविरोधी वागणाऱ्यांवर कारवाई करा असे सांगितले. त्यानुसार रोहित वेमुला आणि त्याच्या मित्रांना होस्टेलमधून बाहेर काढले गेले शिष्यवृत्ती बंद करण्यात आली त्यामुळेच रोहितने आत्महत्या केली असा आरोपही पवार यांनी केला.
मेक इन इंडियात जास्त गुंतवणूक मुंबई परिसरात आली. मुख्यमंत्री विदर्भात गुंतवणूक आणू शकले नाहीत., असे सांगत विरोधी पक्षात असताना विदर्भावर अन्याय झाला म्हणून ते ओरडायचे असा चिमटाही त्यांनी फडणवीस यांना काढला. मेक इन इंडियामध्ये सरकारची नियत चांगली नव्हती, नाही तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आग लागली नसती असा टोला त्यांनी लगावला.
दोषींना पाठीशी घालणार नाही!
परमार प्रकरणाबाबत शरद पवार पहिल्यांदा बोलले. ते म्हणाले, आमचा माणूस दोषी असेल तर मी पाठीशी घालणार नाही. पण परमार यांनी लिहिलेले पत्र सांगत आहे की, परमार आर्थिक अडचणीत होते म्हणून त्यांनी आत्महत्या केली. परमार यांच्या चुकीच्या गोष्टींवर आमच्या नगरसेवकांनी बोट ठेवले तर त्यांना दोषी ठरवून तुरुंगात डांबले जात आहे. हे सुडाचे राजकारण आहे.
वेगळ्या विदर्भाच्या ठरावाला पाठिंबा देऊ
वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याबाबत बोलताना खा. पवार म्हणाले, महाराष्ट्र एकसंघ राहावा, अशी माझी इच्छा आहे. परंतु वेगळा विदर्भ व्हावा ही तेथील लोकांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी तेथील लोकांच्या इच्छेआड येणार नाही. पण मूठभर लोकांची इच्छा असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. आणा वेगळ्या विदर्भाचा ठराव, आम्ही पाठिंबा देतो. पाहू या काय होते ते.
सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात महाविद्यालयीन विद्यार्थीवर्ग अस्वस्थ आहे. आंदोलने केली की त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जातो. त्यामुळे पक्षाच्या विद्यार्थ्यांनी सावध व्हावे. सरकार तुमच्यावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करेल, त्यामुळे तुम्ही त्याची तयारी ठेवा. - शरद पवार