भाजपापुढे युती हाच मार्ग
By Admin | Published: February 24, 2017 04:57 AM2017-02-24T04:57:21+5:302017-02-24T04:57:21+5:30
नेहमीप्रमाणे याहीवेळी औरंगाबाद जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. ६२पैकी २3
औरंगाबाद : नेहमीप्रमाणे याहीवेळी औरंगाबाद जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. ६२पैकी २३ जागा जिंकून भाजपा हा पहिल्यांदाच सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
शिवसेनेने १९ जागा जिंकल्या असून, सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपाला एकत्र यावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वेळी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पार सफाया झाला आहे. काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा चांगले यश संपादन केले आहे. मात्र, सत्ता स्थापनेएवढे बळ या पक्षाकडे नाही.
जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी खा. रामकृष्णबाबा पाटील यांची एक सून शिवसेनेकडून, तर दुसरी काँग्रेसकडून मैदानात होती. यापैकी वैजापूर तालुक्यातील लासूरगाव गटातून सेनेच्या वैशाली पाटील विजयी झाल्या. दुसऱ्या सूनबाई प्रतिभा पाटील यांचा अपेगाव गटात पराभव झाला.
कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांना पराभव पत्कारावा लागला. मात्र, त्या भाजपाच्या उमेदवार नव्हत्या. शिवसेनेचे आ. संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे हे पैठण तालुक्यातील पाचोड गटातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे कन्नड तालुक्यातील हतनूर गटातून विजयी झाले. (प्रतिनिधी)
औरंगाबाद
पक्षजागा
भाजपा२३
शिवसेना१९
काँग्रेस१६
राष्ट्रवादी०२
इतर०२