युतीत शिवसेनेला हवंय प्रत्येक जिल्ह्यात स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:25 PM2019-09-26T14:25:27+5:302019-09-26T14:26:31+5:30
शिवसेनेचे धोरण राज्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यावर असून त्या दृष्टीने प्रशांत किशोर यांच्या सल्लानुसार नियोजन करण्यात येत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युतीला राज्यातही विधानसभेसाठी चांगले वातावरण असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, विधानसभेला आम्हालाच अधिक पसंती असल्याचे भाजपकडून सतत सांगण्यात येत आहे. यावर शिवसेनेसाठी देखील राज्यात चांगले वातावरण असून प्रत्येक जिल्ह्यात आम्हाला स्थान हवय अशी मागणी शिवसेनेने भाजपसमोर ठेवल्याचे समजते.
भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे सतत युती होणारच असा पुनरोच्चार करत आहेत. परंतु, जागा वाटपावरून अद्याप एकमत झाले नाही. शिवसेनेकडून पक्ष विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यात वावग काय, असा सवालही शिवसेनेकडून भाजपला विचारण्यात येत आहे. त्यातच भाजपने जिंकलेल्या काही जागाही शिवसेनेला हव्या आहेत. त्यावर तोडगा काढण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
दरम्यान शिवसेनेचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी भाजपप्रमाणेच शिवसेनेला देखील राज्यात चांगले वातावरण असल्याचे सांगितले. त्याचवेळी शिवसेनेला प्रत्येक जिल्ह्यात स्थान मिळावे, असही त्यांनी शिवसेना प्रमुखांकडे सुचवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला लाभलेल्या प्रतिसादाच्या खालोखाल आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला गर्दी जमल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप मजबूत आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचा एकही आमदार नाही. बीडमध्ये देखील शिवसेनेची अशीच स्थिती होती. येथे भाजपचे वर्चस्व आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राष्ट्रवादीतून आलेल्या क्षीरसागर यांना मंत्रीपद दिले आहे. एकूणच शिवसेनेचे धोरण राज्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यावर असून त्या दृष्टीने प्रशांत किशोर यांच्या सल्लानुसार नियोजन करण्यात येत आहे.