चर्चेतच अडकली युती, आघाडी

By admin | Published: January 26, 2017 02:30 AM2017-01-26T02:30:31+5:302017-01-26T02:30:31+5:30

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ अवघ्या एक दिवसावर आली, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भारतीय जनता पार्टी यांच्यातील आघाडी व युतीची गाडी चर्चेच्या फेऱ्यांमध्येच अडकली आहे

Alliance stuck in the discussion, lead | चर्चेतच अडकली युती, आघाडी

चर्चेतच अडकली युती, आघाडी

Next

पुणे : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ अवघ्या एक दिवसावर आली, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भारतीय जनता पार्टी यांच्यातील आघाडी व युतीची गाडी चर्चेच्या फेऱ्यांमध्येच अडकली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत यावर चारही प्रमुख पक्षांमध्ये काहीही निर्णय झालेला नव्हता. शिवसेनेच्या नेत्यांना प्रतीक्षा आहे मातोश्री वरून येणाऱ्या आदेशाची. त्यामुळे त्यांनी बोलणीच थांबविली आहे.
भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये शिवसेनेबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे तेही चर्चेच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यावरच समाधान मानत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले आहेत, असे सांगितले असले, तरी या स्थानिक नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी बरोबर नक्की कशी बोलणी करायची, यावर एकमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी हवी आहे, पण ती स्वत:च्या अटींवर. त्यात थोडीही तडजोड करायला ते तयार नाहीत, त्यामुळे तीही चर्चा थांबल्यात जमा आहे. चर्चेची गाडी अडकण्यामागे निवडणुकीनंतरचे राजकारणही आहे. सत्ता आलीच, तर त्यावर आपलेच वर्चस्व असावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते.


प्रचारासाठी १२ दिवसांचा अवधी
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मागील पूर्ण आठ दिवस या प्रमुख चारही पक्षांनी निव्वळ चर्चेत घालविले आहेत. त्या आधी या पक्षांनी स्वतंत्रपणे सर्व प्रभागांमधील सर्व जागांसाठी आपापल्या पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
त्यानंतर, त्यांच्यात आघाडी व युतीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे आधीच नावे जाहीर होत नसल्यामुळे वैतागलेले इच्छुक उमेदवार आता तर त्रस्तच झाले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर प्रचारासाठी अवघ्या १२ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यातच उमेदवारी निश्चित होत नसल्यामुळे प्रभागात काहीही करता येत नाही.

Web Title: Alliance stuck in the discussion, lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.