युतीची चर्चा केवळ मुंबईपुरती!
By admin | Published: January 17, 2017 06:43 AM2017-01-17T06:43:00+5:302017-01-17T06:43:00+5:30
मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याने ठाणेसह इतर महापालिकांत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.
मुंबई : शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये सुरू झालेली युतीसंदर्भातील चर्चा केवळ मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याने ठाणेसह इतर महापालिकांत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.
मंत्रालयासमोरील बी-७ बंगल्यावर झालेल्या या चर्चेत भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार सहभागी झाले तर शिवसेनेतर्फे खा. अनिल देसाई, आ. अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर सहभागी झाले.
भाजपाकडून युतीमध्ये १०६ जागांची मागणी करण्यात आली. मुंबई महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या २२७ आहे. युतीच्या जागावाटपात आपण ‘मोठा भाऊ’ असावे असा आग्रहच एकप्रकारे भाजपाने धरला आहे. विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या ताकदीच्या आधारे भाजपाने या जागांवर दावा केला आहे. शिवसेनेने भाजपासाठी जास्तीत जास्त ७५ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. भाजपाने मागितलेल्या जागांमध्ये गेल्या वेळी जिंकलेल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)
पारदर्शक कारभारावर चर्चा
या बैठकीत जागावाटपावर नव्हे, तर पारदर्शक कारभारावर चर्चा झाल्याची माहिती खा. अनिल देसाई व आशिष शेलार यांनी दिली. शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तर भाजपाच्या प्रस्तावावर शिवसेनेचे नेते हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर पुढील बैठकीत पुन्हा चर्चा होईल.