विधानसभा निवडणुकीतही राहणार युती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 03:42 AM2019-05-24T03:42:46+5:302019-05-24T03:44:18+5:30
मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंनी दिली ग्वाही
मुंबई : ‘आमची युती विधानसभा निवडणुकीपर्यंतच नाही तर त्या पुढील निवडणुकांतही कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर बोलताना दिली. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांचे अभिनंदन केले. यावेळी मातोश्रीबाहेर प्रचंड विजयी जल्लोष सुरू होता.
जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आणि युतीच्या ऐक्याचा विजय आहे. जनतेचा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले. मातोश्रीवर आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतल्यासारखे वाटत आहे. आज गोपीनाथ मुंडेंचीही आठवण होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्याकाळात काही चुका घडल्या, युतीतील संबंध काहीवेळा ताणले गेले, जे घडले ते दुर्दैवी होते पण त्यातून आम्ही आता शिकलो आहोत. यानंतरच्या सर्व निवडणुकांना आम्ही एकदिलाने सामोरे जावू.
विरोधी पक्षांनी मोदी व भाजपची निंदा करण्यातच वेळ घालवला. आम्ही विकासाचा, समस्यांवर मात करण्याचा अजेंडा त्यांना दिला. मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला. आता विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. २ दिवस जल्लोष करु पण राज्यासमोरील दुष्काळाचा सामना करण्याचे आव्हान मोठे आहे, त्यावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
ते माझे मोठे भाऊ, त्यांचे मोठे भाऊ नरेंद्र मोदी युतीमध्ये आता मोठा भाऊ कोण या पत्रकारांच्या प्रश्नात, ‘तुम्ही त्यात पडू नका, आमचे आम्ही पाहू’असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. हजरजबाबी मुख्यमंत्री लगेच म्हणाले, उद्धवजी माझे मोठे भाऊ आहेत आणि मोदीजी त्यांचे मोठे भाऊ आहेत’. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर एकच हशा पिकला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी खास कविता सादर केली.
आधी पक्ष कार्यालय मग मातोश्री
राजकीय कारकिर्दीच्या पहिल्या दिवसापासून ज्या पक्षाची अत्यंत निष्ठेने सेवा केली त्या भाजपच्या विजयाने अत्यंत उत्साहित झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरून निघून पहिले गाठले ते भाजपचे कार्यालय. तेथील विजयाच्या जल्लोषात ते सहभागी झाले. तेथून ते उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी मातोश्रीकडे रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांचे तंतोतंत भाकीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात लोकमतशी बोलताना लोकसभा निवडणुकीसंदर्भात जे जे भाकित व्यक्त केले ते ते तंतोतंत खरे ठरले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती ४० हून अधिक जागा जिंकेलच, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांनी तब्बल ७५ हून अधिक सभा घेत राज्य ढवळून काढले होते. प्रचाराचे प्रभावी नियोजन केले. लोकमतशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशात ५५ हून अधिक, पश्चिम बंगालमध्ये १५ हून अधिक, बिहारमध्ये ३५ हून अधिक तर राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये एखाददोन अपवाद वगळता सर्व जागा भाजप/एनडीए जिंकेल असे ठामपणे सांगितले होते. तेही शंभर टक्के खरे ठरले आहे.
लावा रे ते फटाके...
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी मते फोडण्याचा प्रयत्न झाला याकडे लक्ष वेधले असता राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, मला त्यावर काही बोलायचे नाही. आजचा दिवस विरोधकांवर बोलण्याचा नाही. मी फक्त एवढेच म्हणेन, ‘लावा रे ते फटाके’. राज ठाकरे यांच्या ‘लावा रे तो व्हीडीओ’ची त्यांनी अशी खिल्ली उडविली.