युती Vsआघाडी लढत, राणेंची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:06 AM2018-05-04T05:06:03+5:302018-05-04T05:06:03+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी अखेर काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी अखेर काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली. त्यामुळे आता आघाडी विरुद्ध भाजपा-शिवसेना युती अशी थेट लढत सहाही ठिकाणी होणार आहे. मात्र नाशिकमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्याने बंडखोरी करत अर्ज दाखल केल्याने युतीत अस्वस्थता आहे.
लातूर-उस्मानाबादच्या जागेवरून आघाडीत निर्माण झालेला तिढा राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मध्यस्थीनंतर सुटला. त्यानुसार आता अमरावती,
चंद्रपूर-वर्धा आणि परभणी-हिंगोली या तीन जागा काँग्रेस लढविणार असून उस्मानाबाद-बीड-लातूर, नाशिक व कोकण या तीन जागा राष्ट्रवादी लढणार आहे. युतीमध्ये अमरावती, चंद्रपूर-वर्धा आणि उस्मानाबाद-बीड-लातूर या तीन जागा भाजपा लढवत असून कोकण, नाशिक व परभणी-हिंगोली या तीन जागा शिवसेना लढवत आहे. उस्मानाबाद-बीड-लातूरमध्ये कालपर्यंत भाजपात असलेले रमेश कराड हे राष्ट्रवादीकडून लढत आहेत तर आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे सुरेश धस भाजपाचे उमेदवार आहेत. नाशिकमध्ये कालपर्यंत शिवसेनेत असलेले शिवाजी सहाणे आता राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीचे नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे. उमदेवारांच्या या उसनवारीने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.
पोटनिवडणुकीतही आघाडी
लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली आहे. त्यानुसार भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादी, तर पालघर आणि पलूस या ठिकाणी काँग्रेस लढणार आहे.
राणेंची भूमिका महत्त्वाची
माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी कोकणच्या विधान परिषद निवडणुकीत स्वत:चा उमेदवार दिला नाही; पण त्याचवेळी शिवसेनेचा उमेदवार आपण विजयी होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
त्यावरून युतीमध्ये बेबनाव निर्माण होऊ शकतो. आपण आपली भूमिका ७ मे रोजी जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्टÑवादीकडून माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे रिंगणात आहेत.
अशी होणार लढत
मतदारसंघ युती आघाडी
चंद्रपूर-वर्धा रामदास आंबटकर (भाजपा) इंद्रकुमार सराफ (काँग्रेस)
अमरावती प्रवीण पोटे (भाजपा) अनिल माघवगडिया (काँग्रेस)
परभणी-हिंगोली विप्लव बाजोरिया (शिवसेना) सुरेश देशमुख (काँग्रेस)
लातूर-बीड-
उस्मानाबाद सुरेश धस (भाजपा) रमेश कराड (राष्ट्रवादी)
नाशिक नरेंद्र दराडे (शिवसेना) शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)
कोकण राजीव साबळे (शिवसेना) अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)