युतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

By admin | Published: June 28, 2016 05:30 AM2016-06-28T05:30:22+5:302016-06-28T05:30:22+5:30

सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेत सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.

Alliance workers joined each other | युतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

युतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Next


मुंबई : सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेत सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. आधी शाब्दिक हल्ले, पोस्टरबाजी आणि जाळपोळीच्या इशाऱ्यानंतर आता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी रस्त्यावर भिडू लागले आहेत. सोमवारी बोरीवली येथील भगवती रुग्णालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपा खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत भगवती रुग्णालय इमारतीचे उद्घाटन झाले. या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अलीकडे दोन्ही पक्षांत रंगलेल्या वाक्युद्धाचे पडसाद या वेळी उमटले. सुरुवातीला दबक्या आवाजात सुरू असलेली धुसफुस अखेर जोरदार घोषणाबाजी आणि शिव्यांच्या लाखोलीत बदलली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते इरेला पेटल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी सुरू असताना वरिष्ठ नेत्यांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली. कार्यकर्त्यांना शांत करून घोषणाबाजी रोखण्याऐवजी गोंधळ चालू ठेवण्याचे इशारेच ज्येष्ठांकडून दिले जात होते.
विधानसभा निवडणुकीपासून भाजपा-शिवसेनेत सुरू झालेली धुसफुस वाढतच चालली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून होणाऱ्या बोचऱ्या टीकेचा भाजपाने ‘मनोगत’ या आपल्या पाक्षिकातून खरपूस समाचार घेतला होता. त्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी ‘मनोगत’ची होळी करत भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यावर राज्यभर शिवसेना मुखपत्राची होळी करू, असा इशारा भाजपाकडून देण्यात आला. (प्रतिनिधी)
>महापालिकेची रुग्णालये करणार सुसज्ज
मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांना आरोग्यसेवा पुरवणे आवश्यक आहे. प्रत्येक महापालिका रुग्णालयात चांगल्या आरोग्यसेवा दिल्या जातात. यापुढे रुग्णालये सुसज्ज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज केली जातील, अशी माहिती महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिली. सोमवारी बोरीवली येथील हरिलाल भगवती रुग्णालयाचे लोकार्पण महापौरांच्या हस्ते करण्यात आले. परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि पर्यायी रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.
महापालिका नागरिकांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवित आहे. मुंबईत कुठेही एखादी दुर्घटना झाली तर, महापालिकेच्या जवळच्या रुग्णालयात तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरूआहेत. सर्व रुग्णालये सुसज्ज करण्यासाठी काम सुरू आहे, असे महापौरांनी सांगितले. ५० वर्षांपूर्वी हरिलाल भगवती यांनी जमीन दान केली होती. समाजोपयोगी कार्यासाठी ५० वर्षांपूर्वी जमिनी दान केल्या जात होत्या. आता असे दिसून येत नाही, असे मनोगत खा. शेट्टी यांनी केले.
भगवतीचा पहिला टप्पा पूर्ण : पुनर्बांधणीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यात बांधून तयार असलेल्या इमारतीत ११० खाटांचा वैद्यकीय विभाग सुरू करण्यात येणार आहे. तर पुनर्बांधणीच्या दुसऱ्या टप्प्यात ८५२ खाटांचे अत्याधुनिक उच्चस्तरीय रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Web Title: Alliance workers joined each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.