मोदींवरील पुस्तकाचे विद्यार्थ्यांना सक्तीने वाटप-‘पढे भारत, बढे भाजपा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:48 AM2018-05-04T00:48:59+5:302018-05-04T00:48:59+5:30
आटपाडी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत आता शिक्षण विभागाच्याच भाषेत एक नवोपक्रम सुरू केला आहे. पण ‘पढे भारत, बढे भारत’ या त्या उपक्रमांतर्गत विविध प्रकाशकांकडून पूरक वाचनासाठी प्राथमिक शाळेत पुरविण्यात
अविनाश बाड ।
आटपाडी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत आता शिक्षण विभागाच्याच भाषेत एक नवोपक्रम सुरू केला आहे. पण ‘पढे भारत, बढे भारत’ या त्या उपक्रमांतर्गत विविध प्रकाशकांकडून पूरक वाचनासाठी प्राथमिक शाळेत पुरविण्यात आलेल्या पुस्तकात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तके सक्तीने देण्यात आली आहेत. त्यामुळे आता ‘पढे भारत, बढे भाजपा!’ असे नवे अभियान सुरु झाल्याची भावना शिक्षकांतून व्यक्त केली जात आहे.
शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला आणि तिथून पंचायत समितीला प्राथमिक शाळांसाठी अवांतर वाचनासाठी यावर्षी पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. यापूर्वी शासन प्रत्येक शाळेला ठराविक रक्कम देऊन अशी पुस्तके खरेदी करुन गं्रथालयात पुस्तके वाढविण्यास प्रोत्साहन देत होते. यंदा मात्र शासनाने स्वत:च पुस्तकांची खरेदी केली आहे. ही पुस्तके सध्या प्रत्येक शाळेत देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
बुधवारी आटपाडी पंचायत समितीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख सभागृह, बाहेरील व्हरांडा, झाडाखालील कट्टे सर्वच शिक्षक आणि पुस्तके यांनी भरुन गेले होते. शिक्षक मिळालेल्या पुस्तकांची यादी, त्यांची किंमत करण्यात व्यस्त होते. पण अनेकांमध्ये दोनच पुस्तकांची विशेष चर्चा होत होती.
विकासपुरुष व नरेंद्र मोदी आणि चाचा चौधरी आणि मोदी ही दोन पुस्तके, ज्यावर शिक्षकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती. शिक्षक यादी करत-करतच ही पुस्तके चाळताना आणि त्यातील मजकूर वाचताना दिसत होते. विकासपुरुष हे विलास बुक एजन्सी व प्रकाशन नाशिक यांचे ४५ रुपयांचे पुस्तक आहे, तर चाचा चौधरी आणि मोदी हे डायमंड बुक प्रा. लि. नवी दिल्ली या प्रकाशनाचे पुस्तक आहे. दोन्हीही पुस्तकांवर २०१७-१८ हे वर्ष, सर्व शिक्षा अभियानाचा लोगो आहे. दोन्ही पुस्तकात चांगल्या आर्ट पेपरवर पंतप्रधान मोदी यांची अनेक रंगीत छायाचित्रे आणि विकासपुरुष पुस्तकाच्या मागील पानावर पंतप्रधानांचे मातोश्रीसह रंगीत छायाचित्र आहे.
सर्व शिक्षा अभियानात शिक्षण विभागाला, लहान विद्यार्थ्यांना राजकारण आणि भाजपचे नेते, शासनाच्या योजना, भाजपचा रंग यांचेही शिक्षण द्यायचे आहे, असे या पुस्तकांच्या वाटपावरुन तरी दिसते. ज्या शाळांची पटसंख्या ३० पेक्षा जास्त आहे, अशा शाळांना ही पुस्तके सक्तीने देण्यात आली आहेत.
याचा अर्थ भाजपचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा, असाच शिक्षण विभागाचा हेतू दिसतो. यामध्ये संतापजनक गोष्ट एवढीच की, इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी- सातवीच्या शाळेपासून अगदी लहानग्या चिमुरड्यांच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण करण्याऐवजी विशिष्ट पक्ष आणि नेतृत्व यांच्या थोरपणाची भावना शिक्षकांमार्फत, शिक्षण विभागामार्फत रुजविली जात आहे आणि याकडे कुणाचेच लक्ष नाही, हे आश्चर्य आहे.
मोदींचा असाही प्रचार सुरु .....
शालेय अभ्यासक्रमात थोर पुरुषांबद्दल एखादा धडा शिक्षण विभागाने, निवड मंडळातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांसाठी दिला, तर शिक्षकांसह पालकांनाही समजण्यासारखे आहे. पण पंतप्रधानांवरील पुस्तकेच लहान-लहान विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही पुस्तके विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस ठरवून देण्यात यावीत. विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून झाल्यानंतर आपल्या वहीमध्ये त्याचा सारांश, त्या पुस्तकातील आवडलेली वाक्ये तसेच शब्द लिहून काढावेत, तसेच परिपाठाच्यावेळी विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकावर चर्चा करण्याचे आदेशही शिक्षण विभागाने दिले आहेत.