हल्लेखोरास दोन महिन्यांनी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2016 03:52 AM2016-05-17T03:52:31+5:302016-05-17T03:52:31+5:30
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांच्या टोळीपैकी राजकुमार दुबे याला वर्तकनगर पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
ठाणे : लोकमान्यनगर येथील संजय यादव (३०) याला बेदम मारहाण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांच्या टोळीपैकी राजकुमार दुबे याला वर्तकनगर पोलिसांनी मुंबईतून अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याच्या साथीदारांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून दुबे पोलिसांना हुलकावणी देत होता. पोलिसांची चाहूल लागताच आपल्या साथीदारांसह तो पलायन करीत होता. मात्र, पोलीस सतत मागावर असल्यामुळे त्याने सांताक्रूझला घर घेतले. तो तिकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सांताक्रूझमधील वाकोला येथील गोळीबार झोपडपट्टीतून सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, जमादार विलास भोसले, हवालदार हेमंत मोरे, भागवत दहिफाले आणि भूषण गावडे यांच्या पथकाने त्याला ११ मे रोजी अटक केली.
जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी तसेच घराचे बांधकाम केले म्हणून १० हजारांची खंडणी उकळण्यासाठी सुनील तिवारी, सुनील गवळी आणि दुबे यांच्यासह पाच जणांच्या टोळीने संजयला १० मार्च २०१६ रोजी मारहाण करून डोक्यात खलबत्त्याच्या दांड्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार लोकमान्यनगर पाडा क्रमांक-४ भागात घडला होता. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यापैकी राजकुमार हा एकमेव आरोपी दोन महिन्यांनी पोलिसांच्या हाती लागला असून चौघे अद्यापही फरार आहेत. यातीलसंतोष तिवारीवर तीन गुन्हे, तर सुनीलवर अनेक गुन्ह्यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद आहे.