साडेपाच हजार क्विंटल बियाण्यांचे वाटप
By admin | Published: June 9, 2016 01:47 AM2016-06-09T01:47:23+5:302016-06-09T01:47:23+5:30
खेड तालुक्यातील शेतकरीबांधवांना खरिपाच्या पेरणीसाठी ५ हजार ५०० क्विंटल महाबीजचे इंद्रायणी भाताचे बियाणांचे वाटप करण्यात आले
कडूस : खेड तालुक्यातील शेतकरीबांधवांना खरिपाच्या पेरणीसाठी ५ हजार ५०० क्विंटल महाबीजचे इंद्रायणी भाताचे बियाणांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित अर्धे बियाणे प्राप्त झाल्यानंतर लवकरच उर्वरित भाताचे बियाणांचे वाटप करण्यात येणार असून शेतकरीबांधवांसाठी पन्नास टक्केअनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व तीन एच. पी. व पाच एच. पी.च्या वीज मोटारी उपलब्ध असल्याची माहिती खेड पंचायत समितीचे
कृषी अधिकारी मनोज कोल्हे यांनी दिली.
तालुक्यात खतांच्या मागणीनुसार मंजुुरी घेण्यात आली असून खरीप हंगामात एकूण २२ हजार टन खतांची मागणी झाली असून ते खत पुरविण्याचे कंपन्यांनी मान्य केले असल्यामुळे खरीप हंगामात खतांची टंचाई शेतकरीबांधवांना भासणार नसल्याचे कोल्हे यांनी सांगितले. सध्या खेड पंचायत समिती कार्यालयात शेतकरीबांधवांसाठी पन्नास टक्केअनुदानावर कडबाकुट्टी यंत्रे, पाण्यासाठी तीन एच. पी. व पाच एच. पी.च्या मोटारी उपलब्ध असून ज्या शेतकरीबांधवांना या वस्तू पाहिजे असतील, त्यांनी कृषी विभागात संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.
> खरीप हंगामासाठी खेड तालुका पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाची तयारी करण्यात आली असून खेड तालुक्यात भातपिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. प्रामुख्याने भातपिकामध्ये इंद्रायणी या वाणाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. खेड तालुक्यात भाताचे लागवडीखालील क्षेत्र ८५०० हेक्टर आहे. तालुक्यातील पश्चिम आदिवासी दुर्गम मावळ भागात खरिपात भातपिक प्रामुख्याने घेतले जाते.