कार्यालयात घाेडा बांधायची परवानगी द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 06:39 AM2021-03-04T06:39:18+5:302021-03-04T06:39:47+5:30
शासकीय कर्मचाऱ्याचे पत्र व्हायरल. वाढत्या महागाईबरोबरच इंधन दरवाढ डोकेदुखी ठरत असतानाच रोहयो विभागातील सहायक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांची घोडेसवारीला परवानगी मिळण्याची लेखी मागणी चर्चेचा विषय ठरला नसता तरच नवल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पूर्वीच्या काळी प्रवासासाठी घोड्यांचा वापर सर्रास केला जायचा. त्यांची जागा आता दुचाकी व चारचाकी गाड्यांनी घेतली आहे. मात्र, अशातही कुणी रोजच्या प्रवासासाठी घोडेसवारीची परवानगी मागत असेल तर तो नक्कीच चर्चेचा विषय ठरेल. नेमका हाच प्रकार नांदेडमध्ये घडला. येथील सहायक लेखाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागितल्याने हा विषय चर्चेचा ठरला.
वाढत्या महागाईबरोबरच इंधन दरवाढ डोकेदुखी ठरत असतानाच रोहयो विभागातील सहायक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांची घोडेसवारीला परवानगी मिळण्याची लेखी मागणी चर्चेचा विषय ठरला नसता तरच नवल.
३ मार्च रोजी देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून घोडे खरेदीसाठीची लेखी परवानगी मागितली. मला पाठीच्या कण्याचा त्रास आहे. त्यामुळे घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे. घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्याची परवानगी द्यावी अशी रितसर मागणी त्यांनी केली होती. मात्र हे पत्र व्हायरल झाले आणि राज्यभर चर्चा झाली.
अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत देशमुख यांना कार्यालयीन समज दिल्यानंतर घोड्यासाठीची मागणी मागे घेत देशमुख यांना बुधवारी सायंकाळी लेखी माफीनामा सादर करावा लागला. त्यामुळे हा विषय येथेच संपला. पण, यामुळे सोशल मीडियावर इंधन दरवाढीचा मुद्दाही चर्चेत आला होता.
चर्चा मात्र इंधन दरवाढीचीच
n सतीश देशमुख यांच्या या पत्राची सांगड अनेकांनी वाढत्या इंधन दरवाढीशी घातली. इंधनाचे दर आवाक्याबाहेर गेल्याने नागरिक आता घोड्याकडे वळत आहेत.
n त्यात देशमुख यांचे काय
चुकले, असा प्रश्नही अनेकांनी समाजमाध्यमावर केला.
उलट मणक्याचा त्रास वाढतो
घोड्यावरून प्रवास केल्याने पाठीचा त्रास उलट वाढतो. पाठीतील मणके आणि डिस्क घोडेसवारीमुळे दबतात. त्यामुळे कायमचे अपंगत्वही येऊ शकते.
- डॉ. राजेश अंबुलगेकर, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ