"पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनास परवानगी द्या; शेतकरी श्रीमंत होईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 07:27 AM2021-10-19T07:27:33+5:302021-10-19T07:28:03+5:30

सदाभाऊ खोत यांनी पत्राद्वारे शरद पवारांकडे केली मागणी

Allow the production of herbal tobacco sadabhau khot writes to sharad pawar | "पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनास परवानगी द्या; शेतकरी श्रीमंत होईल"

"पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनास परवानगी द्या; शेतकरी श्रीमंत होईल"

googlenewsNext

मुंबई : अमली पदार्थांवरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा कलगीतुरा सध्या महाराष्ट्रात रंगला आहे. यातच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवत हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळवून देण्याची मागणी केली आहे. या मौल्यवान तंबाखूच्या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील शेतकरी श्रीमंत होईल, असा टोमणाच खोत यांनी या पत्रातून लगावला आहे.

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली होती. एनसीबीला तंबाखू आणि अमली पदार्थातील फरकही कळत नाही, अशी टीका एनसीबीवर केली होती. हाच धागा पकडत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पत्र पाठविले आहे. सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजासारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे. गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकऱ्यांना या मौल्यवान हर्बलची शेती करायची आहे, पण राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते. जी सहज मिळत नाही, पण अलीकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे. नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत, असे पत्रात नमूद केले आहे. 

‘कष्टकरी शेतमजूरही श्रीमंत होईल’
या हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ परवानगी मिळवून द्यावी, अशी नम्र विनंती करत असल्याचे खोत यांनी पत्रात म्हटले आहे. जेणेकरून महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल, अशी खोचक टिप्पणीही खोत यांनी पत्रात केली.

Web Title: Allow the production of herbal tobacco sadabhau khot writes to sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.