अलॉय व्हिलमुळे बुडतेय आऊट काढणाऱ्यांची रोजी-रोटी
By admin | Published: October 17, 2016 07:46 PM2016-10-17T19:46:32+5:302016-10-17T19:52:01+5:30
नव्या तंत्रज्ञानाने पारंपरिक व्यवसायांवर गंडांतर येत असल्याची खंत अकोल्यात स्पोक रिंगचे आऊट काढण्याचे काम करणार्या मो. सिद्धीक मो. हनिफ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
अतुल जयस्वाल
अकोला, दि. १७ : काळाचे चक्र गतीमान असते, बदलत्या काळासोबत सर्वच गोष्टी बदलतात. यांत्रिक युगात वाहन क्षेत्रात मोठी क्रांती झाली असून, आज घरोघरी दुचाकी, चारचाकी दिसून येतात. काळानूसार वाहनांमध्येही बदल होत आहेत. दुचाकीच्या स्पोक असलेल्या रिंग आता कालबाहय़ झाल्या असून, त्यांची जागा अलॉय व्हिलने घेतली आहे. या बदलामुळे मात्र पूर्वी स्पोक रिंगचे आऊट काढणार्या कारागिरांची रोजी-रोटी बुडत असल्याचे चित्र आहे. नव्या तंत्रज्ञानाने पारंपरिक व्यवसायांवर गंडांतर येत असल्याची खंत अकोल्यात स्पोक रिंगचे आऊट काढण्याचे काम करणार्या मो. सिद्धीक मो. हनिफ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. शहरात सध्या मो. हनिफ यांच्यासह तीनच कारागिर हे काम करतात.
अकोल्यातील नुक्कड कचोरी कॉर्नर प्रसिद्ध आहे. आकोट स्टँड चौकात असलेल्या या नुक्कड कचोरी लगतच्या कोपर्यातच मो. सिद्धीक यांचे दुचाकींच्या स्पोक रिंगचे आऊट काढण्याचे छोटेसे दुकान आहे. सध्या ५५ वर्षांचे असलेले मो. हनिफ यांनी १९७८ मध्ये त्यांचे वडील मो. हनिफ यांच्याकडून वारसा घेतला. मो. हनिफ यांनी १९५१ मध्ये हे काम सुरु केले होते. तेव्हापासून या चौकात हे दुकान आहे. शहरच नव्हे, तर जिल्हाभरातून त्यांच्याकडे दुचाकीच्या रिंगचे आऊट काढण्यासाठी येणार्यांची गर्दी वाढू लागली. एवढेच नव्हे, तर दुचाकींच्या शोरुमधूनही त्यांच्याकडे दुचाकी येतात. या कामात त्यांचा मुलगा मो. आबीद हा देखील मदत करतो. काळाचे चक्र फिरले व दुचाकींच्या स्पोक रिंगची जागा आता अलॉय व्हील ने घेतली.
यामुळे हळूहळू त्यांच्या या व्यवसायाला उतरती कळा लागली. पूर्वी दिवसाकाठी १५ ते २0 रिंगचे काम करणार्या हनिफ यांच्याकडे आता दिवसातून मोठय़ा मुश्किलने ५ ते ६ रिंगचे काम येते. यामुळे सहा जणांचे कुटुंब चालविणार्या मो. हनिफ यांची आर्थिक ओढ-तान होत आहे. आता सर्वच दुचाकींना अलॉय व्हील असले, तर बुलेट या दुचाकीला अजूनही स्पोक रिंग आहेत. त्यामुळे प्रामुख्याने या दुचाकीच्या रिंग आऊट काढण्यासाठी येत असल्याचे मो. हनिफ यांनी सांगितले.
आऊट चे दोन प्रकार
दुचाकीची रिंग हे स्टेनलेस स्टीलची असून, त्यामध्ये ३६ स्पोक्स असतात. खड्डय़ांमुळे या रिंगचा आकार बदलतो. रिंग वरच्या बाजूने दबल्यास त्याला खडा आऊट, तर बाजून दबाल्यास त्याना आडा आऊट असे म्हटल्या जाते