घराचं स्वप्नं सोबत घेऊनच रुक्सानानं केलं अलविदा!

By admin | Published: April 28, 2015 10:18 PM2015-04-28T22:18:26+5:302015-04-28T23:47:59+5:30

सोमवारी तालुक्याला बसलेल्या वादळाने हसोळ मुस्लीमवाडीतील मीर कुटुंबावर काळाचा घाला घातला आणि सारेच हेलावून गेले.

Along with the dreams of the house! | घराचं स्वप्नं सोबत घेऊनच रुक्सानानं केलं अलविदा!

घराचं स्वप्नं सोबत घेऊनच रुक्सानानं केलं अलविदा!

Next

राजापूर : एकीकडे मंद नवरा तर दुसरीकडे दोन चिल्लीपिल्ली... यांच्यासाठी खस्ता खात नवीन घर बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगून वावरणाऱ्या रुक्साना सुलेमान मीर ही चक्रीवादळाच्या तडाख्यात घरावर वडाचे झाड कोसळून त्याखाली सापडून मृत्युमुखी पडली आणि संपूर्ण घराचा आधारच कोसळून पडला. त्या घटनेने तिचा पती सुन्न झालाच तर दोन्ही मुलेही दु:खसागरात बुडाली. सोमवारी तालुक्याला बसलेल्या वादळाने हसोळ मुस्लीमवाडीतील मीर कुटुंबावर काळाचा घाला घातला आणि सारेच हेलावून गेले. मुख्य रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटर दगड धोंडे व चढ अशी पायवाट असणाऱ्या डोंगराळ भागात सुलेमान दाऊद मीर व त्यांचे भाउ अकबर दाऊद मीर आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. घरामध्ये एकूण नऊ माणसे असून सुलेमान यांची पत्नी रुक्साना मोठी मुलगी शाबीरा, मुलगा अब्रार त्यांचे भाऊ अकबर, भावजय जायदा व त्यांची तीन मुले अलमान, अजमिन, अफान असे एकत्र राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपले राहते घर पाडून त्याजागी नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तेथूनच लगत असणाऱ्या त्यांच्याच जागेत निवासाची पर्यायी व्यवस्था करुन ही दोन्ही कुटुुंबे राहत होती.
स्वत: सुलेमान मीर हे काहीसे मंद असल्याने त्यांची पत्नी रुक्साना हीच कुटुंबाचा आधारस्तंभ होती, तर तिचे दीर अकबर आणि त्यांचे कुटुंंब त्यांना साथ देत होते. नवीन घराचा पक्का पाया बांधून लवकरच पुढील बांधकामदेखील सुरु होणार होते. मात्र, सोमवारी रात्री आलेल्या चक्रीवादळाचा फेरा साक्षात मृत्यूचे पाश घेऊनच आला आणि त्याने सुलेमान यांची पत्नी रुक्साना हिच्यावर घाला टाकला.
घरामागील दरवाजामध्ये रुक्साना उभ्या असतानाच नजीकच असणारे वडाचे झाड चक्रीवादळाने घरावर पडले आणि काही क्षणातच त्याखाली संपूर्ण कुटुंब सापडले. रुक्सानाला तर एवढा मार बसला की ती काही क्षणातच गतप्राण झाली. या अपघातात अकबर मीर यांची दोन मुले अजमिन व अलमान ही गंभीर जखमी झाली. मात्र, घडलेल्या घटनेची वेळीच कल्पना आल्याने अकबर मीर व अन्य मंडळीनी तत्काळ घराबाहेर धाव घेऊन आपला जीव वाचवला. मुसलमानवाडीपासून एका बाजूला डोगराच्या माथ्यावर हे घर असून वरुन कोणीतरी ओरडत आहे हे पाहून खाली असलेल्या अनेक ग्रामस्थांनी वर धाव घेतली त्यावेळी दोन मुले जखमी अवस्थेत तर एक महिला निपचित पडलेली त्यांना आढळून आली. या वादळात वीज पुरवठादेखील खंडित झाल्याने मदत कार्यात मोठा अडथळा येत होता.
तरीदेखील न डगमगून जाता धावून आलेल्या ग्रामस्थांनी जखमी झालेल्या दोन्ही मुलांना पुढील उपचारार्थ दोन किलोमीटरची अवघड पायवाट तुडवीत राजापूर ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र दोन्ही मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व जीवीताला धोका असल्याने त्यांना रत्नागिरीतील परकार रूग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
एकीकडे सुलेमान यांचा संसार उध्वस्त झाला असतानाच दुसरीकडे भावाची दोन मुले मृत्युशी झुंज देत आहेत. (प्रतिनिधी)


घरावर वडाचे झाड पडून मयत झालेल्या रुक्साना सुलेमान मीर यांच्या मृतदेहाचे राजापूर ग्रामीण रुग्णलयात शवविच्छेदन झाल्यानंतर बुधवारी दुपारी दफन विधी करण्यात आला.
राजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी बुधवार सकाळपासून या आपत्तीग्र्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली आहे, तर आपल्या सर्व ग्रामसेवकांना तात्काळ सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Along with the dreams of the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.